Jagjit Singh Dallewal:शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल यांचे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी 133 दिवसांपासून आंदोलन सुरू होते. अखरे डल्लेवाल यांनी रविवारी त्यांचे आमरण उपोषण मागे घेतले आहे. ६ एप्रिल रोजी फतेहगढ साहिब येथील सरहिंद धान्य बाजारात झालेल्या किसान महापंचायतमध्ये त्यांनी ही घोषणा केली आहे. ५ एप्रिल रोजी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी डल्लेवाल यांना उपोषण सोडण्याचे आवाहन केले होते. तसेच चौहान यांनी ४ मे रोजी चंदीगडमध्ये शेतकऱ्यांसोबत बैठक घेणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर डल्लेवाल यांनी उपोषण मागे घेण्याची घोषणा केली आहे.
यावेळी डल्लेवाल म्हणाले की, “अरविंद केजरीवाल यांना वाचवण्यासाठी आप सरकारने आंदोलन संपवले. आप सरकारने आपल्यावर मोठा हल्ला केला आहे. आप सरकार जनतेची दिशाभूल करत आहे. आपली चळवळ सुरू आहे, सुरू राहील आणि शेवटपर्यंत सुरू राहील. शेतकऱ्यांच्या मागणीवरून उपोषण संपवले आहे. बराच काळ शेतकरी आपल्याला उपोषण सोडण्याचे आवाहन करत होते.”
दरम्यान, आंदोलन सुरू झाल्यापासून एक वर्षांनी केंद्र सरकारचे प्रतिनिधी आणि शेतकरी नेत्यांमध्ये बैठका सुरू झाल्या होत्या. १४ फेब्रुवारी २०२५ रोजी पहिली बैठक झाली होती. तर दुसरी बैठक २२ फेब्रुवारी रोजी पार पडली होती. तर तिसरी बैठक १९ मार्च रोजी पार पडली आणि याच दिवशी पंजाब पोलिसांनी आंदोलन उधळून लावले होते. म्हणजेच केंद्र सरकारने आंदोलकांची दखल घेऊन आंदोलकांशी चर्चा सुरू केली होती तेव्हाच आप सरकारने अचानक शेतकरी आंदोलनावर कारवाई करणे हे पंजाबमधील आम आदमी सरकारची विचारपूर्वक रणनीती असल्याच्या देखील चर्चा सुरू झाल्या होत्या.
पिकांच्या किमान आधारभूत किमतीवर कायदेशीर हमीसह आंदोलक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी डल्लेवाल यांनी हजारो शेतकऱ्यांसोबत २६ नोव्हेंबरपासून २०२४ पासून उपोषण सुरू केले होते. अखेर आज शेतकऱ्यांनी विनंती केल्यानंतर डल्लेवाल यांनी उपोषण मागे घेतले आहे.