रविवारी संपूर्ण देशभरात आणि विदेशातही रामनवमीचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शनिवारी रामनवमीच्या पूर्वसंध्येला सगळीकडच्या बाजारपेठा विविध प्रकारच्या भगव्या झेंड्यानी रंगून गेलेल्या पहायला मिळाल्या. तसेच रामनवमीच्या दिवशी देशातील विविध ठिकाणी भव्य अशा शोभा यात्रांचे आयोजन करण्यात आले होते. पुणे आणि मुंबई सारख्या महानगरांमधेही रामजन्मोत्सव मोठ्या भव्य पद्धतीने साजरा करण्यात आला. यादरम्यान शोभा यात्रांना उपस्थित असलेल्या हजारो रामभक्तांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता.यावेळी भाविकांसाठी देशभरात विविध ठिकाणी महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले होते.
या दिवशी अयोध्येतील रामजन्मोत्सव पाहणे हे सर्वांत मोठ आकर्षण असते. दरवर्षीप्रमाणे यंदाही अयोध्या येथे रामजन्मोत्सव मोठ्या उत्सहात साजरा केला गेला. भगवान रामाचे जन्मस्थान असलेल्या अयोध्येतील राम मंदिरात सूर्य टिळक विधी पाहण्यासाठी सकाळपासूनच भाविकांची गर्दी होती. या विधीमध्ये बालक श्री रामलल्ला मूर्तीच्या कपाळावर सूर्यकिरणे येतात. रविवारी सकाळपासूनच अयोध्या शहर भगवामय झाले होते. तिकडे झारखंडची राजधानी रांची देखील राममय झालेली पाहायला मिळाली रांची शहर हे भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघाले.
शिर्डीमध्येही रामनवमीचा उत्साह मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतो. रविवारी शिर्डी साईबाबासंस्थानच्या वतीने 114 वा श्रीरामनवमी उत्सव साजरा केला गेला. यावेळी रणरणत्या उन्हाची तमा न बाळगता अनेक भाविक श्रद्धेने अनवाणी पायाने शिर्डीकडे मार्गस्थ होताना दिसून आले. यावर्षी 100हून अधिक पायी पालख्या शिर्डीमध्ये दाखल झाल्या होत्या. या उत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा असून महाराष्ट्रासह गुजरात, गोवा, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश इत्यादीं राज्यांमधून या दिवशी पालख्या शिर्डीत येतात.
यावेळी उत्तर प्रदेशातील संवेदनशील जिल्ह्यांमध्ये गणल्या जाणाऱ्या संभलमध्येही रामनवमीचे दृश्य लक्ष वेधून घेत होते. विश्व हिंदू परिषदेने आयोजित केलेल्या या मिरवणुकीत शेकडो लोक सहभागी झाले होते, ज्यात महिला, पुरुष आणि तरुणांची संख्या मोठी होती काही महिन्यांपूर्वी इथे अशांततेचे वातावरण होते.पण आता त्याच शहरात रस्त्यावरून शांतता, श्रद्धा आणि सौहार्दाचा संदेश देणारी भव्य मिरवणूक काढली गेल्याने फक्त स्थानिकांसाठीच नाही तर संपूर्ण जिल्ह्यासाठी हा एक ऐतिहासिक दिवस बनला.ज्या शहरात रामनवमीला धार्मिक मिरवणुकीची कल्पनाही केली नव्हती, तिथे आता भगवान श्रीरामांची मिरवणूक काढण्यात आली लोकांनीदेखील त्याचे खुल्या मनाने स्वागत केले असल्याचे दिसून आले.
राम जन्मोत्सव हा फक्त भारतातच साजरा झाला असे नाही तर विदेशातही मोठ्या प्रमाणत साजरा करण्यात आला.अबुधाबी येथील प्रसिद्ध BAPS हिंदू मंदिरात रामनवमी आणि स्वामी नारायण जयंती मोठ्या थाटामाटात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली. यादरम्यान विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. ज्यामध्ये भाविक आणि अभ्यागतांची मोठी गर्दी होती, या कार्यक्रमाच्या माध्यमातून संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये सांस्कृतिक आणि आध्यात्मिक एकतेला प्रोत्साहन देण्यात आले. BAPS मंदिराचे मुख्य पुजारी ब्रह्मविहारी स्वामी यांच्या मते, सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत राम भजन आणि त्यानंतर श्री रामजन्मोत्सव आरतीसह हा उत्सव दिवसभर चालला.