अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची अलीकडील काही निर्णय किंवा धोरणे चर्चेचा विषय बनली आहेत. या धोरणांमध्ये टॅरिफ (आयात शुल्क) वाढवणे, बेकायदेशीर स्थलांतरितांचा मुद्दा, कर्मचारी कपातीचे निर्णय आणि विविध देशांवर व्यापारी कर लावणे यांचा समावेश आहे. या निर्णयांचा परिणाम जगभरातील अनेक देशांवर आणि कंपन्यांवर होतो आहे, ज्यामुळे उत्पादनांची किमत आणि बाजारपेठा प्रभावित होत असल्याचे दिसून येत आहे.
ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांवर नकारात्मक प्रभाव पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे शेअर बाजारांमध्ये घसरण दिसून आली आहे, विशेषतः अमेरिका, भारत आणि इतर देशांतील बाजारांवर त्याचा परिणाम होत आहे. मात्र, अशी परिस्थिती असतानाही मी माझी धोरणे कधीही बदलणार नाही, अशी भूमिकाच डोनाल्ड ट्रम्प मांडत असल्याचं पाहायला मिळत आहे.
जेंव्हा या संदर्भात काही पत्रकारांनी डोनाल्ड ट्रम्प यांना प्रश्न विचारला. तेंव्हा ट्रम्प यांनी म्हटले की, “कधीकधी तुम्हाला काहीतरी दुरुस्त करण्यासाठी औषध घ्यावे लागते” याशिवाय, ट्रम्प यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की, “अमेरिकेत येणाऱ्या गुंतवणूकदारांनो, हि श्रीमंत होण्याची एक उत्तम वेळ आहे.” त्यांची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे. यादरम्यान ट्रम्प यांनी जो बायडेन यांच्यावरही टिकास्त्र सोडले ते म्हणाले “अमेरिकेला इतर देशांनी वाईट वागणूक दिली. याचं कारण म्हणजे आपल्याकडे आधी जे नेतृत्व होते, ते मूर्ख नेतृत्व होते ज्यामुळे हे घडले आहे.”
अशा परिस्थितीत, ट्रम्प यांच्या धोरणांविरोधात अमेरिकेतील नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. सरकारी नोकऱ्यांमध्ये कपात, अर्थव्यवस्था आणि मानवी हक्क यावर चिंता व्यक्त करत हजारो अमेरिकन नागरिकांनी मोर्चे काढले आहेत. विशेषतः, सरकारी कर्मचारी आणि माजी सैनिकांच्या मदतीसाठी काम करणाऱ्या विभागांतील कर्मचारी कमी करण्यात आले आहेत, ज्यामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली आहे.