रामनवमी निमित्त काल देशभरात जल्लोष साजरा करण्यात आला. महाराष्ट्रात देखील राम जन्मोत्सवानिमित अनेक ठिकाणी वेगवगेळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. पालघरमध्ये देखील हिंदू संघटनांतर्फे शोभा यात्रा काढण्यात आली होती. यावेळी या यात्रेवर काही लोकांकडून अंडी फेकण्यात आली.
या सर्व प्रकारामुळे हिंदू समाजाच्या श्रद्धेला तडा गेला असून, हिंदू समाज संतप्त झाला आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेत प्रकरण शांत केले. या परिसरात रात्रभर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘ही शोभा यात्रा चिखलडोंगरी येथील सर्वेश्वर मंदिरापासून विरारच्या ग्लोबल सिटीमध्ये असलेल्या पिंपळेश्वर मंदिरापर्यंत काढण्यात आली होती. रॅलीत 100 ते 150 दुचाकी, एक रथ आणि दोन टेम्पोचा समावेश होता. दरम्यान, ही रॅली पिंपळेश्वर मंदिराजवळ पोहोचली असता काही घरांमधून या यात्रेवर अंडी फेकण्यात आली.
यानंतर हिंदू तरुण संतप्त झाले आणि परिसरातील वातावरण तणावपूर्ण झाले. याची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. पोलिसांनी पुढे सांगितले की, परिसरात तणावपूर्व स्थिती निर्माण करणे आणि धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली बीएनएसच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.’
याप्रकरणी पोलिसांनी एका संशयित व्यक्तीलाही ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. असं पोलिसांनी सांगितलं आहे.
दरम्यान, घटनास्थळी लावलेले सीसीटीव्ही फुटेजही पोलीस तपासत असून, लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.