गृहमंत्री अमित शहा सध्या जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी कठुआ जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेजवळ असलेल्या बीएसएफ चौकीला भेट दिली आहे. यावेळी त्यांनी बीएसएफ जवानांचे कठीण परिस्थितीत भारताच्या सीमेचे रक्षण करण्यासाठी कौतुक केले आहे. तसेच त्यांनी बीएसएफ जवानांनी सीमेचे रक्षण करण्यासाठी केलेल्या संघर्षाची तुलना होऊ शकत नसल्याचं म्हंटल आहे. यासोबतच सैनिकांच्या धैर्याची आणि समर्पणाची प्रशंसा करत त्यांच्या योगदानाला सर्वोच्च आदर दिला आहे.
यावेळी गृहमंत्र्यांनी सीमा सुरक्षेसाठी नवीन तंत्रज्ञानाची घोषणा देखील केली आहे. ते म्हणाले की, ‘भारताच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी सरकार लवकरच नवीन तंत्रज्ञांचा वापर करणार आहे. खासकरून या तंत्रज्ञांचा वापर भूमिगत सीमापार असलेले बोगदे शोधण्यासाठी केला पाहिजे. शाह पुढे म्हणाले की, या नवीन तंत्रज्ञानामुळे सीमा सुरक्षा दलांना अधिक कार्यक्षमतेने काम करता येईल.’
दरम्यान, राजभवनात जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि अमित शहा यांनी दहशतवादी हल्ल्यात बलिदान दिलेल्या अकरा जवानांच्या कुटुंबीयांची देखील भेट घेतली आहे.
यावेळी गृहमंत्र्यांनी बलिदान दिलेल्या जवानांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले आणि त्यांना धीर दिला. यासोबतच मदत करण्याचे देखील आश्वासन दिले आहे. देशासाठी बलिदान दिलेल्या जवानांच्या कुटूंबियांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला आहे. त्यांच्या कुटुंबीयांना शक्य ती सर्व मदत सरकार कडून केली जाईल, हा देश त्यांना कधीही विसरू शकत नाही, असे अमित शाह यावेळी म्हणाले आहेत.