Tanisha Bhise Case Pune: दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या सावळ्या गोंधळामुळे गर्भवती तनिषा सुशांत भिसे या महिलेचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. आता या घटनेवरती राज्य शासनाने डॉ. राधाकृष्ण पवार यांचा अध्यक्षतेखाली रूग्णालयाची चौकशी करण्यासाठी जी समिती नेमली होती, त्या समितीचा अहवाल समोर आला असून या समितीनेही रूग्णालयाला दोषी ठरवले आहे. त्यानंतर रूग्णालयावर जोरदार टीका होऊ लागली आहे.
याच पार्श्वभूमीवर रूग्णालयाचे संचालक डॉ. धनंजय केळकर यांनी आज( ७ मार्च ) पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी रूग्णालयाची बाजू मांडताना म्हटले आहे की, डॉक्टरांनी डिपॉझिट मागण्याची पद्धत आमच्या हॉस्पिटलमध्ये नाही, परंतु या प्रकरणात डॉक्टरांच्या डोक्यात काय आले आणि त्यांनी दहा लाख रुपये डिपॉझिट मागितले.आमच्याकडे डॉक्टरांकडून अनामत रक्कम मागितली जात नाही. आजवर मी अगणित शस्त्रक्रिया केल्या आहेत, पण आतापर्यंत कोणालाही असे लिहून दिले नाही”.
रूग्णालयात जर कोणाला डिपॉझिट घ्यायचे असेल तर ते बिलिंग डिपार्टमेंटला डॉक्टरांशी बोलून समजून घेऊन त्या रक्कमेपैकी किती रक्कम घ्यायची हे ठरवले जाते. मात्र हे काही सिलेक्टेड केसेसमध्येच होते. तनिषा भिसे प्रकरणामध्ये तशाप्रकारचे डिपॉझिट डॉक्टरांशी बोलूनन ठरवण्यात आले होते, अशी कबुलीही डाॅ. केळकर यांनी यावेळी दिली आहे.
डॉ. सुश्रूत घैसास यांच्या राजीनाम्यावरती बोलताना केळकर म्हणाले की, घैसास हे रुग्णालयाचे कर्मचारी नसून ते गेले १० वर्षे कन्सल्टन्ट म्हणून काम करत आहेत. गेले काही दिवस ते सामाजिक दडपणाखाली वावरत आहेत, धमक्यांचे फोन, समाजमाध्यमांवर होणारी कठोर टीका आणि सामाजिक संघर्षामुळे होणारे वातावरण त्यांच्या सहन करण्याच्या पलीकडे होईल अशी भीती वाटत आहे. या सगळ्याचा आताच्या रूग्णावरती उपचार करताना परिणाम होईल असे त्यांना वाटत आहे. ते रात्रीही झोपू शकत नाहीत. त्यामुळे इतर रुग्णांवर अन्याय होण्यापेक्षा आणि कुटुंबाच्या संरक्षणाकरता त्यांनी दीनानाथ रुग्णालयातील पदाचा राजीनामा दिला आहे.