Donalad Trump: जगातील दोन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिका आणि चीन या दोन देशांमधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. काही दिवसांपूर्वी चीनने अमेरिकेच्या उत्पादनावर ३४ टक्के कर आकारला होता. त्याच पार्श्वभूमीवर सोमवारी अमेरीकेचे अध्यक्ष डोनाल्ड्र ट्रम्प यांनी चीनने त्यांचा हा निर्णय मागे घेतला नाही तर अमेरिका चीनवर अतिरिक्त कर लादेल, असा इशारा ट्रूथ या सोशल मीडियाद्वारे दिला होता. त्यानंतर आता चीनने डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीला प्रत्युत्तर दिले आहे.
अमेरीकेच्या टॅरिफ ब्लॅकमेलला चीन घाबरणार नाही, अशा शब्दात चीनने प्रत्युत्तर दिले आहे. चीनच्या मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे की, “चीनने घेतलेला निर्णय त्यांचे सार्वभौमत्व, सुरक्षा आणि विकास हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी आहेत. तसेच, सामान्य आंतरराष्ट्रीय व्यापार व्यवस्था राखली पाहिजे. हा पूर्णपणे न्याय आहे. चीनवर कर वाढवण्याची अमेरिकेची धमकी ही एक चूक आहे. ही एकतर्फी छळवणूक आहे. जर अमेरिकेने आयात शुल्क मागे घेतले नाही तर चीन शेवटपर्यंत लढेल”.
आयात शुल्कावरून वाटाघाटी करण्यास चीनने प्रयत्न सुरू केले आहेत. आम्ही संवाद आणि सहकार्याद्वारे वाद सोडवण्याचा सल्ला देऊ, असे देखील चीनच्या मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. परंतु आम्ही आमच्या कायदेशीर हक्कांचे आणि हितांचे रक्षण करण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा इशाराही चीनने दिला आहे. परंतु जर ट्रम्प यांनी चीनला दिलेल्या धमकीनुसार चिनी उत्पादनांवर नवीन शुल्क लादले तर चिनी वस्तूंवरील एकूण अमेरिकन शुल्क १०४% पर्यंत पोहोचेल.
दरम्यान, ट्रम्प यांनी केलेल्या टॅरिफच्या घोषणेनंतर जगभरातील शेअर बाजार कोसळले आहेत. शेअर बाजारातल्या सध्याच्या या घसरणीमुळे गुंतवणूकदारांवर भीतीचे सावट आहे. सध्याच्या शेअर बाजारात तयार झालेल्या गोंधळामुळे लोकांच्या जीवनावर आणि आर्थिक परिस्थितीवर मोठा परिणाम होऊ शकतो असा इशारा, तज्ज्ञांनी दिला आहे