Kamda Ekadashi: हिंदू धर्मात चैत्र महिन्यातील शुक्ल एकादशीला विशेष महत्त्व आहे. या एकादशीला कामदा एकदशी असेही म्हणतात. कामदा एकादशीला भगवान विष्णूच्या पूजेला विशेष महत्व आहे. त्यामुळे आज पंढरपूरात लाखोंच्या संख्येने भाविक विठूरायाचे दर्शन घेण्यासाठी जमले आहेत. यावेळी पंढरी हरिनामाच्या गजरात न्हावून निघाल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे शिखर शिंगणापूरच्या यात्रेसाठी जाणाऱ्या शंभू महादेवाच्या कावडीही आज पंढरपूरात दाखल झाल्या आहेत.
कामदा एकादशीच्या दिवशीच कर्नाटकातील हंपी येथील कृष्णदेव राजा यांच्याकडून संत एकनाथ महाराज यांचे आजोबा भानुदास महाराज यांनी पांडुरंगाची मूर्ती पंढरीत आणून प्रतिष्ठापणा केली, म्हणून या दिवशी देवाला पुरण पोळीचा नेवैद्य दाखविण्याची शेकडो वर्षाची परंपरा वारकरी संप्रदायमध्ये आहे. त्यामुळे आज वारकरी पंढपूरात दर्शनासाठी आले आहेत.
असे म्हटले जाते की, या दिवशी उपवास केल्याने पापे दूर होतात तसेच सर्व इच्छा पूर्ण होतात. जीवनात सुख समृद्धी येते. या दिवशी भगवान विष्णुची पूजा आराधना करणे शुभ मानले जाते. या दिवशी विष्णूच्या काही मंत्राचा जप केल्याने मनाप्रमाणे फळ मिळते. कामदा एकादशीच्या दिवशी दान करणे पुण्याचे कार्य मानले जाते. या दिवशी जर कोणतीही व्यक्ती अगदी मनापासून काही गोष्टी दान करत असेल तर भगवान विष्णू त्याची सर्व इच्छा पूर्ण करतात, असे देखील म्हटले जाते.
एकंदरित कामदा एकदशी हा दिवस विष्णूच्या चरणी लीन होण्याची सुवर्णसंधी मानली जाते. या दिवशी भक्त आपल्या इंद्रियांवर विजय मिळवत, अन्न-पाण्याचा त्याग करून केवळ हरीच्या नामस्मरणात तल्लीन होतात. अर्थातच चैत्र एकादशी म्हणजे या चैत्र महिन्यातील भगवतभक्तीचा मंगलमय दिवस मानला जातो.