राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाल्यापासून विविध प्रकारच्या योजना आणि निर्णयांचा धडाका सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज (मंगळवार) सरकारने आणखी एक कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. आता जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीताला राज्यशासनाने राज्यगीताचा दर्जा दिला आहे.या निर्णयानंतर राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये हे गीत आता सक्तीने वाजवले किंवा गायले जाणार आहे. शासनाने नुकताच यासंबंधीचा निर्णय जाहीर केला असून, या निर्णयानुसार आता शाळांमध्ये राष्ट्रगीत, परिपाठ, प्रार्थना, प्रतिज्ञा यांच्यासोबतच हे राज्यगीत देखील वाजवणे बंधनकारक असणार आहे.
खरतर महाराष्ट्राच्या अभिमानाचा आवाज असलेल्या या गीताचे शब्द मराठी मनाला सळसळता उत्साह देतात. हे गीत केवळ संगीत न ठेवता, विद्यार्थ्यांच्या मनात राज्यभक्ती आणि संस्कृतीचे भान निर्माण करण्यासाठी प्रभावी ठरणार आहे, असे शिक्षणतज्ज्ञांचे मत आहे. राज्यसरकारच्या या निर्णयाचे अनेक स्तरांतून स्वागत होत असून, मराठी अस्मिता आणि संस्कृती जपण्याच्या दृष्टीने हे एक सकारात्मक पाऊल मानले जात आहे.शाळांमध्ये ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गीत सकाळच्या परिपाठात किंवा विशेष कार्यक्रमांवेळी गाण्यास सांगितले जाईल, तसेच त्यासाठी शिक्षक व विद्यार्थ्यांना पूर्वतयारीची सूचना दिली जाणार आहे. हे राज्यगीत राज्याच्या विधानसभेत देखील अनेकदा वाजवले असल्याचे दिसून आले आहे.
संगीत क्षेत्रातील दिग्गज श्रीनिवास खळे यांची संगीत आणि राजा बडे यांच्या शब्दांची समृद्धता असलेले हे गीत आजही प्रत्येक मराठी हृदयात खोलवर रुजलेले आहे. या निर्णयामुळे भविष्यातील पिढ्यांमध्ये राज्याच्या इतिहासाविषयी अभिमानाची भावना जागृत होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.