माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे सरकार पडल्यानंतर बांगलादेशात अंतरिम सरकारची स्थापन करण्यात आली. देशात झालेल्या हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेख हसीना यांना देश सोडावा लागला होता. बांगलादेश सोडल्यानंतर शेख हसीना यांनी भारतात आश्रय घेतला आहे.
बांगलादेशात सत्तापालट झाल्यानंतर अंतरिम सरकारचे प्रमुख म्हणून मोहम्मद युनूस यांची निवड करण्यात आली. दरम्यान, युनूस यांनी देशाची सर्व सूत्रे हातात घेतल्यापासून शेख हसीनांचा पक्ष अवामी लीगच्या नेत्यांना लक्ष करत आहे. यादरम्यान, शेख हसीना यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे.
शेख हसीना यांनी अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस यांच्यावर निशाणा साधत म्हंटले आहे की, ‘अल्लाहने मला एका कारणासाठी जिवंत ठेवले आहे. एक दिवस येईल जेव्हा अवामी लीगच्या नेत्यांना मी न्याय मिळवून देईल.’
अवामी लीगच्या अध्यक्षांनी सोशल मीडियावर त्यांच्या पक्षाच्या नेत्यांच्या कुटुंबीयांशी बोलताना हे सांगितले.
पुढे मुहम्मद युनूस यांच्यावर हल्लाबोल करत शेख हसीना म्हणाल्या, ‘त्यांनी गरिबांना जास्त व्याजदराने पैसे उधार दिले आणि त्या पैशाने ते परदेशात विलासी जीवन जगले.’ त्यावेळी आम्हाला त्यांची खरी बाजू दिसली नाही आणि म्हणून आम्ही त्यांना खूप मदतही केली. त्यांच्या योजनेचा लोकांना काहीच फायदा झाला नाही. उलट त्यांनी फक्त स्वतःसाठीच काम केले. आता त्यांची सत्तेची भूक बांगलादेशला हानी पोहोचवत आहे.’
विकासाचे मॉडेल म्हणून पाहिले जाणारे बांगलादेश आता दहशतवादी देश बनत आहे. आमचे नेते आणि कार्यकर्ते ज्या पद्धतीने मारले जात आहेत ते शब्दात वर्णन करता येणार नाही. अवामी लीगचे लोक, पोलिस, वकील, पत्रकार आणि कलाकार सर्वांना लक्ष्य केले जात आहे. पुढे त्यांचे वडिल व देशाचे पहिले राष्ट्रपती शेख मुजीबुर रहमान यांच्यासह संपूर्ण कुटुंबाच्या हत्येची आठवण करून भावनिक होत त्या म्हणाल्या, ‘मी एकाच दिवसात माझे वडील, आई, भाऊ आणि संपूर्ण कुटुंब गमावले आहे. त्यानंतर, आम्हाला आमच्या स्वतःच्या देशात परतण्याची परवानगी देण्यात आली नाही. जवळच्यांना गमावण्याचे दुःख मला समजते.”
अल्लाह माझे रक्षण करतो आहे. त्याला माझ्याद्वारे काहीतरी चांगले घडवून आणायचे असेल. ज्यांनी हे भयंकर गुन्हे केले आहेत त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. ही माझी प्रतिज्ञा आहे.
अवामी लीगच्या नेत्यांना कसे मारण्यात आले याबद्दल ऐकून दुःख झाले. एक दिवस न्याय नक्की मिळेल. अल्लाह अशा अत्याचारांना कधीही माफ करणार नाही. मी येत आहे….’ असंही हसीना पुढे म्हणल्या.
कोण आहेत मोहम्मद युनूस ?
मोहम्मद युनूस यांच्या हातात बांगलादेशाची सत्ता येण्याआधी ते चितगाव विद्यापीठात अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते. त्यांना ‘बँकर ऑफ द पुअर’ म्हणूनही ओळखले जाते. युनूस आणि त्यांनी स्थापन केलेल्या ग्रामीण बँकेला 2006 मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला आहे.
1983 मध्ये त्यांनी ग्रामीण बँकेची स्थापना केली होती. त्यांनी ग्रामीण भागातील गरीबांना 100 डॉलर्सपेक्षा कमी कर्ज देऊन लाखो लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यास मदत केली. यामुळे बांगलादेशातील मोठ्या संख्येने लोकांचे जीवनमान उंचावण्यात यश मिळाले. तसेच युनूस हे माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे कट्टर विरोधक देखील आहेत.