पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. भूतान देशाची नागरिक असलेल्या 27 वर्षीय तरुणीवर पुण्यात सात जणांकडून लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी कार्यकर्ता शंतनु कुकडे याला अटक केली असून, त्याच्या चौकशीत त्याने अन्य साथीदारांसह पीडित महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचे कबूल केले आहे.
या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत वकिलांसह सहा जणांना अटक केली आहे. ऋषिकेश नवले (वय 48), प्रतीकशिंदे (वय 36), विपीन बीडकर (वय 48), सागर रासगे (वय 35), अविनाश सूर्यवंशी (वय 58) आणि मुद्दसीर मेमन (वय 38) अशी अटक केलेल्यांची नाव आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, ही भूतानी महिला 2020 पासून पुण्यात राहत आहे. पुण्यात शिक्षण आणि नोकरी करण्याच्या निमित्ताने तिची ओळख आरोपी ऋषिकेश याच्यासोबत झाली. ऋषिकेश याने त्या पीडित महिलेची ओळख त्याचा मित्र शंतनू कुकडे याच्यासोबत करून दिली. कुकडे याने पीडित महिलेला पुण्यात वास्तव्यास एक घर दिले व तिच्या शिक्षणासाठी देखील आर्थिक मदत केली. याच ओळखीचा फायदा घेत शंतनु कुकडे याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. पीडित महिला निराधार आणि असहाय्य्य असल्याचा फायदा घेत कुकडे याने महिलेच्या इच्छेविरुद्ध शरीसंबंध ठेवले. पुढे दोन वर्षांनी शंतनूने त्याच्या मित्रांचीही ओळख करून दिली. हे सगळेजण अनेकदा बाहेरही जायचे. या मित्रांनी वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या वेळी पीडित तरुणीवर लैंगिक अत्याचार केले. अशी माहिती पीडित महिलेने पोलिसांना दिली आहे.
दरम्यान, शंतनू कुकडे याच्यावर काही दिवसांपूर्वी दोन तरुणींनी लैंगिक अत्याचारप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी त्याप्रकरणी गुन्हाही दाखल केला होता. आताच्या प्रकरणात पोलिसांनी शंतनू कुकडे आणि त्याच्या मित्रांना अटक केली आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.