पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुद्रा योजनेला दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. गेल्या दहा वर्षात या योजनेचा फायदा घेत अनेकजण आज स्वतःच्या पायावर उभे आहेत. दरम्यान, या योजनेला दहा वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पंतप्रधानांनी लाभार्थ्यांशी दिल्लीत संवाद साधला. दिल्लीत आयोजित कर्यक्रमाला अनेक लाभार्थी महिलांनी हजेरी लावली होती. जिथे पंतप्रधान मोदींनी या योजनेचा उद्देश सांगत. स्वतःच्या पायावर उभ्या असलेल्या महिलांचे कौतुक केले.
येथे उपस्थितांशी संवाद साधताना पंतप्रधान म्हणाले की, ‘मुद्रा योजना ही कोणत्याही विशिष्ट गटापुरती मर्यादितनसून तिचा उद्देश हा तरुणांना स्वतःच्या पायावर उभे करणे हा आहे. मुद्रा योजनेने उद्योजकतेकडे पाहण्याचा सामाजिक दृष्टिकोन बदलून एक क्रांती घडवून आणली आहे. पुढे पंतप्रधान म्हणाले, ‘मुद्रा योजनेत सर्वात जास्त लाभार्थी महिला आहेत. या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत ५२ कोटी कर्जे देण्यात आली आहेत. जी जागतिक स्तरावर एक अनोखी कामगिरी आहे.’ असं पंतप्रधान या कार्यक्रमादरम्यान म्हणाले आहेत.
https://twitter.com/narendramodi/status/1909448798054515141
काय आहे मुद्रा योजना?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या कार्यकाळात ८ एप्रिल २०१५ रोजी पंतप्रधान मुद्रा योजनेची सुरुवात करण्यात आली होती. अल्प उत्पन्न गटातील लोकांना निधी उपलब्ध करुन त्यांच्यात व्यवसायाचा विकास करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. या योजनेत तीन गटांत कर्ज वितरण केले जाते. पहिले शिशु कर्ज ५० हजारांपर्यंत कर्ज दिले जाते. त्यानंतर दुसऱ्या गटात किशोर कर्ज ज्यात ५० हजार ते ५ लाखांपर्यंतचे कर्ज मिळते. त्यानंतर सर्वात शेवटचा गट येतो तो म्हणजे तरुण गट. या गटात ५ लाख ते १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळते.
सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँका, एनबीएफसी, एमएफआय आणि सहकारी बँकांसह एकूण १७८ वित्तीय संस्था मुद्रा योजनेचे कर्ज देत आहेत .
दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या मुद्रा योजनेमुळे आतापर्यंत फक्त वैयक्तिक स्तरावरच नव्हे तर त्यातून अनेक उद्योग देखील उभे राहिलेले आहेत. ही योजना सुरु झाल्यापासून सातत्याने वाढत चालली आहे.