भारतीय जनता पक्षाने काँग्रेसवर दलितविरोधी असल्याचा आरोप केला आहे. खरं तर, मंगळवारी संध्याकाळी (८ एप्रिल २०२५) अहमदाबादमधील काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीदरम्यानचा एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये साबरमती आश्रमात झालेल्या प्रार्थना सभेदरम्यान काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना बाजूला बसवण्यात आले होते.
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, सोनिया गांधी आणि राहुल गांधी मध्यभागी सोफ्यावरबसले आहेत, तर खरगे यांना बाजूला वेगळी खुर्ची देण्यात आली आहे. याच मुद्द्यावरून भाजपने काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
भाजप आयटी सेलचे प्रभारी अमित मालवीय यांनी हा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करत त्यांनी लिहिले की, “आधी खरगेजींचा आदर करायला शिका…ते काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत….त्यांची खुर्ची बाजूला ठेवण्याचा अर्थ काय? यावरून स्पष्ट होते की, काँग्रेस दलितविरोधी आहे.” अशी पोस्ट त्यांनी केली आहे.
https://twitter.com/amitmalviya/status/1909832318652760360
सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होताच ही घटना काँग्रेससाठी लाजिरवाणी ठरली आहे. पक्षाचे सर्वात मोठे नेते, दलित समाजातून आलेले अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी अशी वागणूक पाहून सध्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. जर काँग्रेस स्वतःच्या अध्यक्षांना आदर देऊ शकत नाही, तर दलित समुदाय काय अपेक्षा करणार? असे प्रश्न आता अनेकजण विचारत आहेत.
दरम्यान, काँग्रेसवर असा आरोप होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही प्रियंका गांधी यांच्या उमेदवारी अर्जादरम्यान खरगे यांना बाहेर उभे राहावे लागले होते. तेव्हाही काँग्रेस दलितांचा आदर करत नसल्याचे बोलले गेले होते. आता साबरमती आश्रमातील ही घटना काँग्रेससाठी आणखी समस्या निर्माण करत आहे. या प्रकरणातून काँग्रेस फक्त व्होट बँकेचे राजकारण करते असा संदेश जनतेत जात आहे.