Pratap Sarnaik:काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी यांची नियुक्ती एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदावर केली होती. त्यावेळी मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे फक्त नावापुरतेच परिवहन खाते राहील, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या होत्या. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाचा निर्णय मागे घेतला होता. आता एसटी महामंडळावर अधिकृतपणे परिवहनमंत्री प्रताप सरनाईकच राहणार असल्याचे निश्चित झाले आहे.
प्रताप सरनाईक हे एसटी महामंडळाचे २६ वे अध्यक्ष ठरले आहेत. महाराष्ट्र शासन केंद्रीय अधिनियमान्वये तयार केलेल्या नियम व आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. एसटी महामंडाळाच्या अध्यक्ष पदावर नियुक्ती झाल्यानंतर प्रताप सरनाईक यांनी या पदावर नियुक्त करून महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे त्यांनी आभार मानले आहेत.
एसटी महामंडळाला डिझेल पुरवठा करणाऱ्या कंपन्यांकडील सीएसआर निधीच्या माध्यमातून राज्यातील काही महत्वाच्या बसस्थानकांवर महिलांसाठी स्वच्छतागृहे आणि हिरकणी कक्ष उभारून ते चांगल्या स्थितीत राहतील अशी व्यवस्था करावी, अशा महत्वाच्या सूचना सरनाईक यांनी आता दिल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना सरनाईक म्हणाले की, “महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेची लोकवाहिनी असलेल्या एसटीला भविष्यात आर्थिक दृष्ट्या सक्षम करून एक चांगली दर्जेदार परिवहन सेवा निर्माण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे.”
दरम्यान, 2014 ते 2019 मध्ये दिवाकर रावते हे परिवहन मंत्री होते आणि तेच एसटी महामंडळाचे अध्यक्ष होते. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनिल परब यांच्याकडे मंत्रिपदची आणि अध्यक्षपदाची जबाबदारी होती. हीच परंपरा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना कायम ठेवण्यात आली होती. त्यावेळी एकनाथ शिंदे हेच राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष होते. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी या परंपरेला ब्रेक दिला होता. आता पुन्हा एकदा शिंदे गटाचे मंत्रीच एसटी महामंडळावर कायम ठेवण्यात आले आहेत.