अहमदाबादमध्ये काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बुधवारी पक्षातील नेत्यांना थेट इशारा दिला. “पक्षात काम न करणारे नेते आता विश्रांती घ्या, जबाबदारी न घेणाऱ्यांनी निवृत्त व्हावं,” असं खरगे म्हणाले आहेत. त्यांनी हे स्पष्ट केले आहे की, आता काँग्रेस संघटना बळकट करण्यासाठी मोठे पावले उचलली जाणार आहेत. यादरम्यान भाजपवर टीका करत त्यांनी सांगितलं की “काँग्रेस देशाच्या एकतेसाठी लढते आहे, तर भाजप समाजात फूट पाडत आहे.”
जिल्हाध्यक्ष महत्त्वाचे; पक्षपात नको
खरगेंनी सांगितलं की, आता जिल्हाध्यक्षांची भूमिका खूप महत्त्वाची असणार आहे. त्यांची नियुक्ती पक्षपाताविना होईल आणि उमेदवार निवडीतही त्यांच्या मताला महत्त्व दिले जाईल. नियुक्तीनंतर एक वर्षाच्या आत, बूथ, मंडळ, ब्लॉक आणि जिल्हा कमिट्या तयार करायच्या असतील तर त्या पारदर्शकपणे कराव्यात, असंही त्यांनी सांगितलं. देशातील जिल्हाध्यक्षांच्या तीन बैठका घेण्यात आल्या असून राहुल गांधी आणि मी त्यांच्याशी चर्चा केली आहे. उमेदवार निवडीत त्यांना सामील करून घेण्याचा निर्णय आंम्ही घेतला आहे असे ते म्हणले आहेत.
ईव्हीएमवर शंका, मतपत्रिकेची मागणी
खरगेंनी ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटलं, “जग पुन्हा मतपत्रिकांकडे वळतंय, मग आपण का नाही? ” त्यांनी मतपत्रिकेच्या आधारेच मतदान घेण्याची मागणी केली. तसंच, भाजपने महाराष्ट्र निवडणुकीत फसवणूक करून सत्ता मिळवली, असा आरोपही त्यांनी केला आहे. खरगेंनी केंद्र सरकारवर आरोप केला की, ते स्वतःच्या फायद्यासाठीच ईव्हीएमसारखं तंत्रज्ञान वापरत आहेत आणि गेली ११ वर्षे राज्यघटनेवर सातत्याने हल्ले करत आहे.त्यामुळे काँग्रेसने आता राज्यघटनेच्या रक्षणासाठी लढा उघडला आहे, असं ते म्हणाले. संसदेतही विरोधकांना बोलू दिलं जात नाही, अशीही तक्रार त्यांनी केली.
आता खर्गे ईव्हीएमवर शंका उपस्थित करत असले तरी ईव्हीएमची सुरुवात मुळात काँग्रेसच्या कार्यकाळातच झाली होती. तेंव्हा याच मशिनच्या सहाय्याने ते अनेकदा सत्तेत आले. पण त्यावेळेला मात्र कोणीही ईव्हीएमवर शंका उपस्थित केली नाही. आता परिस्थिती अशी आहे. की देशातील बहुतांश राज्यातून काँग्रेस हद्दपार झाली आहे. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीतही काँग्रेसला पराभावाचा सामना करावा लागला. गेल्या वर्षी झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत तर काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या आघाडीच्या नेत्यांचा पराभव झाला, हा पराभव त्यांच्या इतक्या जिव्हारी लागला की यानंतर काँग्रेसने ईव्हीएमवर शंका उपस्थित करायला सुरुवात केली. तसेच याविरोधात आंदोलने करून बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे अशी मागणी होऊ लागली. आताही खर्गे यांनी मतपत्रिकेच्या आधारे मतदान घेण्याची मागणी केली आहे पण त्यांच्या या मागणीला यश येतंय का? ते पहाणे महत्वाचे ठरणार आहे.