Ajit Pawar: विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा पिंपरी सत्कार कार्यक्रम नुकतात पार पडला. या कार्यक्रमावेळी बोलताना अजित पवार यांनी चौफेर फटकेबाजी केल्याचे पाहायला मिळाले. याच कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी शरद पवारांबाबत बोलताना मोठे विधान केले. आम्हीसुद्धा आमच्या कुटुंबात कालही शरद पवारांना दैवत मानत होतो आणि आजही मानतो. पण तळ्यात मळ्यात केल्यास निर्णय घेता येत नाहीत, असे अजित पवार म्हणाले. आता अजित पवारांच्या या वक्तव्याची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे.
त्यातच आता आमदार छगन भुजबळ यांनीही पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार यांची स्तुती केली आहे. “माझे भाग्य आहे की, 25 ते 27 वर्षे मला बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा नेता मिळाला, खरेतर मी त्यांचा उजवा हात होतो. मला त्यांच्या जवळ राहून काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर मला शरद पवार यांच्यासारखा नेता मिळाला. दोन्ही नेते हे मोठे नेते आहेत. या दोघांपासूनही आम्ही शिकलो. हे दोन्ही नेते मला आदरस्थानी आहेत,” असे छगन भुजबळ म्हणाले आहेत. छगन भुजबळांच्या या वक्तव्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
पत्रकार परिषदेत बोलताना भुजबळांनी आरक्षणाविषयीही भाष्य केले आहे. भुजबळ म्हणाले की, “गेल्या 25 ते 30 वर्षांपासून आम्हाला पूर्णपणे आमचे आरक्षण द्या, अशी मागणी करत आहोत. तसेच आताही आमचे नगरपालिका, जिल्हा परिषदेचे आरक्षण अडकून आहे. आमची जनगणना करा, अशी आमची मागणी आहे. आम्हाला आमचे पूर्ण आरक्षण द्या किंवा आमची माणसे मोजा.”
दरम्यान, अजित पवार आणि छगन भुजबळ यांनी लागोपाठोपाठ शरद पवारांची स्तुती केल्याने जनसामान्यांमध्ये विविध चर्चांणा उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवार बीडच्या दौऱ्यावर असतानाही ‘चुलत्याच्या कृपेने बरे चाललेय’ असे वक्तव्य केले होते. त्यामुळे वेळ पडल्यास अजित पवार शरद पवार एकत्र येतील, अशी शक्यता देखील अनेकजण व्यक्त करत आहेत.