स्लोवाकियाचे अध्यक्ष पीटर पेलेग्रिनी यांनी भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा (UNSC) कायमस्वरूपी सदस्य होण्यासाठी पूर्ण पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. हे वक्तव्य त्यांनी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत केले.ते म्हणाले, “संयुक्त राष्ट्रामध्ये भारताला सुरक्षा परिषदेचा नवीन कायम सदस्य बनवण्याच्या प्रयत्नांना स्लोवाकिया पूर्णपणे पाठिंबा देईल.”
सध्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या स्लोवाकियाच्या दौऱ्यावर असून त्यांनी या दौऱ्यात स्लोवाकियाचे अध्यक्ष पीटर पेलेग्रिनी यांची भेट घेतली.या भेटीत दोन्ही नेत्यांनी भारत आणि स्लोवाकियामधील चांगल्या संबंधांवर चर्चा केली. राष्ट्रपती मुर्मू यांनी स्लोवाकियाने स्वागत आणि आदरातिथ्य केल्याबद्दल आभार मानले आणि दोन्ही देशांमधील परस्पर सन्मान आणि सहकार्याचे कौतुक केले.
राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की,, या सुंदर देशाच्या माझ्या पहिल्याच राजकीय भेटीत स्लोवाकियामध्ये येऊन मला खूप आनंद झाला आहे. माझे आणि माझ्या प्रतिनिधी मंडळाचे स्वागत आणि आदरातिथ्य केल्याबद्दल मी अध्यक्ष पेलेग्रिनी आणि स्लोवाकियाच्या लोकांचे आभार मानते. भारत आणि स्लोवाकिया परस्पर आदर, लोकशाही आदर्श आणि जागतिक सहकार्यासाठी सामायिक दृष्टिकोनावर आधारित आहेत. आमचे दोन्ही देश आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर एकमेकांना पाठिंबा देतात, जे आमच्या खोल मैत्रीचे प्रतिबिंब आहे. आमचे व्यापार संबंध भरभराटीला येत आहेत आणि अलिकडच्या वर्षांत आमचा व्यापार आणि गुंतवणूक लक्षणीयरीत्या वाढली आहे,” असे मुर्मू म्हणाल्या. युक्रेनमधून भारतीय आणि विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात स्लोवाकियाने दिलेल्या अटल पाठिंब्याबद्दल मी त्यांचे आभार मानू इच्छिते. भारत स्लोवाकियाचे सहकार्य आणि उदारता नेहमीच लक्षात ठेवेल, असेही त्या म्हणल्या आहेत.
दोन्ही देशांनी आण्विक सहकार्य, सांस्कृतिक देवाणघेवाण, आणि इतर अनेक क्षेत्रांतील सहकार्य वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर एकत्र काम करण्याचा संकल्पही व्यक्त केला. गेल्या पाच वर्षांत भारत-स्लोवाकिया व्यापार तिप्पट झाला असून सध्या तो जवळपास 1.3 अब्ज युरोपर्यंत पोहोचला आहे. भारताची तिथे गुंतवणूकही वाढली आहे, ज्यामध्ये नित्रा शहरातील टाटा-जग्वार लँड रोव्हरचा कारखाना महत्त्वाचा आहे.
या भेटीदरम्यान, राष्ट्रपती मुर्मू आणि अध्यक्ष पेलेग्रिनी एकत्रितपणे “भारत-स्लोव्हाक व्यवसाय मंच” सुरू करणार आहेत आणि नित्रामधील कारखान्याला भेट देणार आहेत. तब्बल ३० वर्षांनंतर भारताच्या राष्ट्रपतींचा हा पहिलाच स्लोवाकियाचा दौरा असून, त्यामुळे दोन्ही देशांचे संबंध आणखी बळकट होतील, अशी अपेक्षा आहे.