Santosh Deshmukh: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आजच्या सुनावणीत वाल्मिक कराडविरूद्ध मोठा पुरावा सादर करण्यात आला आहे. त्यामुळे आरोपी वाल्मिक कराडवरचा फास अधिक घट्ट झाला आहे. कारण आजच्या सुनावणीत सरकारी पक्षाच्यावतीने विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी न्यायालयात संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचा व्हिडीओ पुरावा म्हणून सादर केला आहे.
सुनावणीदरम्यान, वाल्मिक कराडने माझ्या विरोधात कोणताही ठोस पुरावा नाही, मला निर्दोष ठरवण्यात यावे, अशी मागणी केली होती. मात्र, उज्ज्वल निकम यांनी कोर्टात सादर केलेल्या व्हिडीओमुळे त्याचा दावा फारसा ठोस न ठरता बचावात अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र असे असेल तरी आरोपींवरील आरोप अद्याप निश्चित झालेले नाहीत.
सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने संतोष देशमुखयांच्या हत्येचा प्रत्यक्ष व्हिडिओ न्यायालयासमोर सादर केला होता. मात्र उज्वल निकम यांनी न्यायालयाला विनंती केली की, हा व्हिडिओ प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध होऊ नये, अन्यथा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. न्यायालयाने या प्रकरणात सीआयडीचे मत मागवले असून, ते २४ एप्रिल रोजी सादर केले जाणार आहे.
दरम्यान, सरकारी पक्षाने आरोपी वाल्मिक कराड याची चल आणि अचल संपत्ती जप्त करण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. अद्याप कराडकडून या अर्जावर कोणताही खुलासा आलेला नाही, असे निकम यांनी सांगितले. तसेच मोक्का कायद्यानुसार कराडची संपत्ती जप्त करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे, असे निकम यांनी आज पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले आहे.