देशभरात सध्या वक्फ बोर्ड हा विषय चर्चेत आहे. याचदम्यान, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री धामी यांनी राज्यातील वक्फ मालमत्तांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच ज्या मालमत्तांवर वक्फने बेकायदेशीरपणे कब्जा केला आहे त्या जमिनी देखील रिकाम्या करण्यात येणार असल्याचे त्यांनी घोषित केले आहे.
मुख्यमंत्री धामी यांनी अल्पसंख्याक विभाग आणि इतर विभागांची एक टीम तयार करून राज्यातील बेकायदेशीर वक्फ मालमत्तांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
२००३ मध्ये उत्तराखंड राज्याच्या निर्मितीच्या वेळी वक्फ बोर्डाच्या २०७८ नोंदणीकृत मालमत्ता होत्या. परंतु आज त्यांची संख्या ५१८३ झाली आहे. अशा परिस्थितीत, मोठा प्रश्न उपस्थित होत आहे की, दान केल्याने जमिनींची संख्या वाढली आहे की, यामागे आणखी काय कारण आहे?
गेल्या काही काळापासून उत्तराखंडमध्ये अनेक वक्फ मालमत्ता उदयास आल्या आहेत ज्या एकेकाळी सरकारच्या मालकीच्या होत्या या जमिनींवर वक्फने दावा ठोकत वक्फ बोर्डाकडे अधिकृत नोंदणी करून घेतल्या. अशातच मुख्यमंत्री धामी यांच्या या निर्णयामुळे राज्यात खळबळ उडाली आहे.
माध्यमांनी वक्फवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले की, ‘देवभूमीतील वक्फ बोर्डाच्या मालमत्तेची चौकशी केली जाईल. जेव्हा राज्याची स्थापना झाली तेव्हा सुमारे दोन हजार मालमत्ता होत्या आणि आता त्या इतक्या कशा वाढल्या आहेत? याचे कारण शोधले जाणार आहे. यामध्ये काही गैरप्रकार आढळला तर त्या मालमत्ता परत घेतल्या जातील.
पुढे त्यांनी असेही सांगितले की, ‘सरकारी जमीन ताब्यात घेऊन बांधलेल्या वक्फ मालमत्तांचा वापर आम्ही सार्वजनिक हितासाठी करू.’
वक्फ मालमत्ता काय आहे?
वक्फ मालमत्ता ही मूलत: इस्लामच्या अनुयायांनी धार्मिक, धर्मादाय किंवा सामाजिक हेतूंसाठी दान केलेली मालमत्ता आहे.