छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास, त्यांचे गडकिल्ले, महाराष्ट्राची संस्कृती यांचा अनुभव देणारी एक खास “सर्किट ट्रेन” लवकरच सुरू होणार आहे. या ट्रेनची घोषणा रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ही ट्रेन १० दिवसांची टूर करणार असून, यातून शिवाजी महाराजांचे गडकिल्ले, ऐतिहासिक स्थळं आणि सांस्कृतिक ठिकाणं पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे लोकांना इतिहास समजायला आणि महाराष्ट्रातील संस्कृती जवळून अनुभवायला मिळणार आहे.
दरम्यान रेल्वे मंत्र्यां बरोबर घेतलेल्या पत्रकार परिषदेत फडणवीसांनी या योजनेची माहिती दिली. मुंबईतील बरेच रेल्वे प्रकल्प प्रगतीपथावर आहेत असं ही फडणवीसांनी सांगितलं. शिवाय राज्यातील 132 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येत आहे. महाराष्ट्रासाठी 1 लाख 73 हजार कोटीचे रेल्वे प्रकल्प उभारले जाणार आहेत. यावर्षी जवळपास 24 हजार कोटी राज्याच्या पदरात पडले आहेत. या सर्वाचाच एक भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराज सर्किट ट्रेन आहे. या ट्रेनची दहा दिवसाची टूर असणार आहे. या माध्यमातून ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचे किल्ले आहेत. सांस्कृतीक स्थळं आहेत, त्या ठिकाणी ही रेल्वे जाणार आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुंबईतील वेव्ह्स समिट 2025 हजेरी लावली होती होती त्यावेळी ते बोलत होते.
या सर्किट ट्रेनमुळे काय फायदे होतील?
– छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले पाहता येतील
– महाराष्ट्राच्या इतिहासाची ओळख होईल
– पर्यटनाला चालना मिळेल
– स्थानिक भागांचा विकास होईल
या व्यतिरिक्त आता विदर्भाकडेही विशेष लक्ष दिलं जात आहे. रेल्वेमार्गामुळे विदर्भाचा छत्तीसगड आणि तेलंगणासोबतचा व्यापार वाढणार आहे. तसेच गोंदिया ते बल्लारशा दरम्यानची रेल्वे लाईन आता दुहेरी केली जाणार आहे.” यासाठी 4819 कोटी रुपये केंद्र सरकारने दिले आहेत. हा मार्ग झाल्यास त्याचा फायदा थेट विदर्भाला होणार आहे. व्यापर व्यवसाय वाढण्यास याचा फायदा होईल. अतिशय विचार करून हा मार्ग पुढे नेला जात असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
शिवाय दुसऱ्या राज्याच्या सीमेपर्यंत हा मार्ग जात आहे. शिवाय दुर्गम जिल्हा त्याला जोडला गेला आहे. त्यामुळे जिल्ह्या बरोबरच इतर भागाचाही त्यातून विकास होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रातील जवळपास 132 स्थानकांचा विकास केला जाणार असल्याचे ही यावेळी फडणवीस यांनी सांगितले. ही 132 स्टेशन्स महाराष्ट्रातील केंद्र सरकारने रेल्वे मिनिस्ट्री डेव्हलपमेंट करता घेतलेली आहे. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा देखील समावेश आहे. रेल्वे मंत्रालयाने मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राच्या पदरात दान टाकले आहे. त्यामुळे रेल्वेचे मोठे जाळे आणि सुधारणा होण्यास मदत होणार असल्याचं फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केलं.
मुख्यमंत्री आणि केंद्रीय रेल्वेमंत्र्यांच्या या प्रयत्नामुळे महाराष्ट्रात रेल्वेच्या विकासाला नवे गतीमान स्वरूप मिळणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज सर्किट ट्रेनसारख्या उपक्रमांमुळे इतिहास, संस्कृती आणि पर्यटन यांचा संगम अनुभवता येणार आहे. हा केवळ प्रवास न राहता, महाराष्ट्राच्या शौर्यगाथेची सजीव सफर ठरणार आहे. स्थानिक विकास, रोजगार संधी आणि सांस्कृतिक जपणूक या साऱ्यांचा एकत्रित परिणाम म्हणजेच ‘विकसित महाराष्ट्रा’कडे उचललेलं एक महत्त्वाचं पाऊल!’असे म्हणता येईल.