पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवार, ११ एप्रिल रोजी एक दिवसासाठी वाराणसी (काशी) दौऱ्यावर होते. त्यांनी येथे ३,९०० कोटी रुपयांच्या ४४ विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. काशीच्या लोकांनी पंतप्रधान मोदींचे जोरदार स्वागत केले. मेहंदीगंज येथे झालेल्या जाहीर सभेत मोदींनी काशीच्या जनतेशी भोजपुरी भाषेत संवाद साधला. ते म्हणाले, “काशी माझी आहे आणि मी काशीचा आहे.”
मोदीं म्हंटले की, गेल्या १० वर्षांत वाराणसीचा खूप विकास झाला आहे. काशी हे आता केवळ प्राचीन धार्मिक शहर नसून, आधुनिक आणि प्रगतीशील शहर बनले आहे. पूर्व उत्तर प्रदेशमध्ये (पूर्वांचल) काशी हे आता महत्त्वाचे आर्थिक केंद्र झाले आहे. ते म्हणाले, “उद्या हनुमान जयंती आहे आणि आज मला संकटमोचन महाराजांच्या काशीमध्ये यायची संधी मिळाली, ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे.”
आरोग्य सुविधांबाबत बोलताना पंतप्रधान म्हणाले की, काशी आता आरोग्याची राजधानी बनत आहे. दिल्ली आणि मुंबईसारखी चांगली रुग्णालये आता वाराणसीत उपलब्ध आहेत, जेणेकरून लोकांना दूर जावे लागत नाही. मोदी म्हणाले की, “तुम्ही आम्हाला तिसऱ्यांदा संधी दिली, त्यामुळे आम्ही तुमचे सेवक म्हणून जबाबदारीने काम करत आहोत.”
यावेळी त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले जयंतीवरही भाष्य केले आहे. त्यांनी सांगितले की, ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी खूप काम केले. त्यांचा आदर्श ठेवून, आपणही महिलांना सक्षम बनवण्याचे काम करत आहोत.
खरतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काशी दौरा हा केवळ विकास कामांचा धावता आढावा नव्हता, तर तो काशीच्या जनतेशी त्यांच्या हृदयातील नात्याचा उत्कट प्रत्यय देणारा प्रसंग होता. “काशी माझी आहे आणि मी काशीचा आहे”, या त्यांच्या शब्दांनी लाखोंच्या अंतकरणाला स्पर्श केला.पंतप्रधान मोदींच्या सहकार्यामुळे प्राचीनतेचा अभिमान बाळगणाऱ्या आणि आधुनिकतेकडे वेगाने झेपावणाऱ्या काशीने आज एक नवा चेहरा धारण केला आहे. महिला सक्षमीकरणापासून आरोग्याच्या राजधानीपर्यंतचा काशीचा प्रवास हा भविष्यातील भारताचा आराखडाच दर्शवतो. विकासाच्या या यज्ञात सहभागी झालेल्या काशीच्या जनतेच्या उत्साहाने आणि मोदींच्या दृढनिश्चयाने, निश्चितच ही नगरी देशासाठी प्रेरणास्थान बनत असल्याचे दिसून येत आहे.