Phule Movie: राष्ट्रीय पुरस्कार विजेते अनंत महादेवन यांनी दिग्दर्शित केलेला ‘फुले’ हा चित्रपट 11 एप्रिल 2025 ला सिनेमागृहात प्रदर्शित होणार होता. परंतु राज्यातल्या ब्राह्मण महासंघाने आक्षेप घेतल्यानंतर चित्रपटाचे प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. आता नव्या तारखेनुसार चित्रपट 25 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.
नेमका फुले चित्रपटावर आक्षेप का घेण्यात आला आहे:
-ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितले आहे की, ट्रेलरमध्ये ब्राह्मण समुदायाबद्दल “फारशा चांगल्या नसलेल्या गोष्टी” अयोग्यरित्या अधोरेखित केल्या आहेत.
– ट्रेलरमधील एका दृश्यामध्ये एक ब्राह्मण मुलगा सावित्रीबाई फुले यांच्यावर शेण फेकताना दिसत आहे. पंरतु ब्राम्हण महासंघाचे म्हणणे आहे की, चित्रपटात चांगले आणि वाईट दोन्ही पैलू दाखवले पाहिजेत. अर्थातच महासंघाचे म्हणणे आहे की, की ट्रेलरमध्ये महात्मा फुले यांच्या शाळा स्थापन करण्यात आणि सामाजिक सुधारणांना चालना देण्यात ब्राह्मणांचे सकारात्मक योगदान दाखवण्यात चित्रपट अपयशी ठरत आहे.
-तसेच जर चित्रपटाचे चित्रण केवळ नकारात्मक पैलूंवर केंद्रित असेल तर संपूर्ण भारत आणि जागतिक स्तरावर लोकांमध्ये ब्राह्मण समुदायाबद्दल नकारात्मक मत निर्माण होऊ शकते.
-महासंघाकडून विरोधाच्या घटनांसह ऐतिहासिक सत्ये दाखविण्यास विरोध नाही. मात्र महासंघ अधिक समावेशक चित्रणावर आग्रही आहेत, जे महात्मा फुले यांना काही ब्राह्मणांकडून मिळालेल्या पाठिंब्यावर देखील प्रकाश टाकते.
तसेच काही दलित संघटनांनी देखील चित्रपटाला विरोध केला आहे. चित्रपटाच्या निर्मिती प्रक्रियेत आणि कथानकात पुरेसा विचारविनिमय न केल्याचा आरोप काही दलित संघटनांनी केला आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी समाजातील शोषित आणि मागासलेल्या लोकांसाठी केलेल्या कार्याचे योग्य प्रतिनिधित्व चित्रपटात नसेल अशी दलित संघटनांना भिती आहे.
दरम्यान, चित्रपटाबद्दल वाद वाढल्यानंतर सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाच्या निर्मात्यांना अनेक बदल करण्याचे आदेशही दिले आहेत. विशेष करून जातिव्यवस्थेचा उल्लेख करणारा व्हॉइसओव्हर काढून टाकण्यास सांगण्यात आले आहे. याशिवाय चित्रपटातून महार, मांग, पेशवाई आणि मनुस्मृती जातिव्यवस्था हे शब्द काढून टाकण्याची मागणी करण्यात आली आहे.