Beed Santosh Deshmukh: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशमुख यांना अमानुष पद्धतीने मारहाण करण्यासाठी वाल्मीक कराड गँगने चार खास हत्यारे बनवल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भातील एक रिपोर्ट समोर आला आहे.
समोर आलेल्या रिपोर्टमधून आरोपींच्या क्रूरतेचे नवीन तपशील उघड झाले आहेत. संतोष देशमुख यांना मारण्यासाठी जी हत्यारे वापरण्यात आली, ती खास बनवलेली होती. या हत्यारांमध्ये गॅस पाईप, गाडीच्या क्लच वायरपासून बनवलेला धातूचा चाबूक, लाकडी बांबूची काठी आणि लोखंडी पाईप यांचा समावेश होता. या चार हत्यारांचा वापर करून देशमुख यांच्यावर एकामागोमाग एक हल्ले करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
या हल्ल्यामुळे देशमुखांच्या शरीरावर तब्बल 150 जखमा आढळून आल्या. आरोपींनी याआधीही इतर लोकांवर याच हत्यारांनी हल्ले केल्याची धक्कादायक माहिती देखील समोर आली आहे. तीन डॉक्टरांच्या वैद्यकीय पथकाने दिलेल्या या अहवालात, या हत्यारांचा उपयोग केल्यास मृत्यू निश्चित आहे, असे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे संतोष देशमुखांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता, हे निश्तित होते.
दरम्यान, तपास यंत्रणेकडून आरोपींविरोधात जे आरोपपत्र सादर करण्यात आले आहे, त्यामध्ये या हत्यारांचे फोटो आणि वैद्यकीय अहवाल जोडण्यात आले आहेत. त्यामुळे आरोपींविरोधात पुरावे अधिक मजबूत झाले आहेत.