देशभरात काल हनुमान जयंती मोठ्या थाटमाटात साजरी करण्यात आली. हनुमान जयंतीच्या निमित्ताने वेगवेगळ्या भागात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मध्य प्रदेशात देखील हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मात्र, यावेळी एक घटना घडली. ज्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
मध्य प्रदेशातील गुना येथे हनुमान जयंतीनिमित्त मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. याच मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली. एका विशिष्ट समुदायाच्या लोकांवर दगडफेकीचा आरोप करण्यात आला आहे.
मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आल्यानंतर लोकांनी पळापळ सुरु केली ज्यामुळे परिसरात चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली होती. तसेच परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
समोर आलेल्या माहितीनुसार, घोसी मोहल्ला येथील माडिया मंदिरातून ही मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीचे आयोजक मुले आणि तरुण होते. या मिरवणुकीत अजूनही सुमारे ५० लोक होते. ही मिरवणूक हात रोड रपटेकडे जाताच, मदिना मशिदीजवळील समद चौकात या मिरवणुकीवर हल्ला करण्यात आला. यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेले पोलिसही परिस्थिती हाताळू शकले नाहीत. अशापरिस्थितीत घटनास्थळी गोंधळ उडाला आणि पळापळ सुरु झाली.
घनस्थळी उपस्थित पोलिसांना या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात अपयश आल्यानंतर ताबडतोब आणखी पोलिसांची मदत मागण्यात आली. त्यानंतर घटनास्थळी मोठ्या संख्येने पोलिस तैनात करण्यात आले आणि परिसर काही काळासाठी बंद ठेवण्यात आला.