Inida Russia News: युक्रेनने आज म्हणजेच १३ एप्रिल रोजी एक धक्कादायक दावा केला आहे. युक्रेनने दावा केला आहे की, रशियन क्षेपणास्त्रांनी कीवमधील एका भारतीय औषध कंपनी ‘कुसुमच्या’ गोदामावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात लहान मुले आणि वृद्धांसाठी आवश्यक असलेली औषधे नष्ट झाली असल्याचा आरोप युक्रेनने केला आहे. युक्रेनमधील भारतीय दूतावासाने सोशल मीडियावर या हल्ल्याची माहिती दिली आहे.
युक्रेनच्या दूतावासाने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, रशिया भारतासोबत मैत्रीचा दावा करत आहे, मात्र रशिया जाणूनबुजून युक्रेनमधील भारतीय व्यवसायांना लक्ष्य करत आहे. तसेच युक्रेनच्या दूतावासाने या हल्ल्याचा तीव्र निषेधदेखील केला आहे. युक्रेनच्या या दाव्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आहे. मात्र काहीजण सांगत आहेत की, रशियन क्षेपणास्त्राचे लक्ष्य भारतीय औषध कंपनी कुसुमचे गोदाम नसून अँटोनोव्हचा कारखाना होता.परंतु भारतीय औषध गोदामावर हल्ला का करण्यात आला हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.
मात्र रशियाकडून अद्याप या हल्ल्याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. तसेच भारत सरकारकडून या प्रकरणावरती काय उत्तर येणार हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे. तसेच याचा रशिया आणि भारत यांच्यातील संबंधांवर काय परिणाम होणार का हे पाहणे देखील तितकेच महत्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, युक्रेन प्रशासनाने अद्याप या हल्ल्यात झालेल्या जीवितहानी किंवा मालमत्तेच्या नुकसानीबद्दल तपशीलवार माहिती दिलेली नाही. मात्र या हल्ल्यात १५ दशलक्ष डॉलर्स किमतीची औषधे नष्ट झाली आहेत, अशी माहिती समोर येत आहे.तसेच गोदामातील औषधे नष्ट झाल्याने युक्रेनमधील आरोग्य सेवांवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.