८ एप्रिलपासून पासून देशात वक्फ सुधारणा कायदा २०२५ लागू करण्यात आला आहे. वक्फ बोर्डाच्या मनमानी कारभाराला आळा घालण्यासाठी हे विधेयक लोकसभा तसेच राज्य सभेत सादर करण्यात आले. या विधेयकावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये दीर्घ चर्चेनंतर हे विधेयक दोन्ही सभागृहांमध्ये मजूर करण्यात आले. मात्र, असे असतानाही विरोधक या विधेयकाला आता विरोध करताना दिसत आहेत.
देशातील अनेक भागात या विधेयकाविरोधात आंदोलनं सुरु आहेत. दरम्यान, पश्चिम बंगालमधून या विधेयकाला मोठा विरोध होत आहे.
पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद येथे मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरु असून या आंदोलनाने आता हिंसक वळण घेतले आहे. ज्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ११८ जणांना अटक केली आहे. जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना चार राउंड गोळीबार देखील करावा लागला होता. ज्यामध्ये काहीजण जखमी झाले असल्याचे समजते आहे. जखमींचा अधिकृत आकडा समोर आलेला नाही.
दरम्यान, येथील तणावाच्या स्थितीत बीएसएफने राज्य पोलिसांच्या मदतीसाठी पाच कंपन्या तैनात केल्या आहेत. यासंबंधित आयजी दक्षिण बंगाल फ्रंटियर करणी सिंह शेखावत यांनी माहिती दिली आहे.
त्यांनी सांगितले की, ‘बीएसएफ पोलिसांशी समन्वय साधून काम करेल आणि प्रदेशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी गरज पडल्यास अधिक सैन्य पाठवेल.’
माध्यमांशी बोलताना शेखावत म्हणाले की, ‘या परिस्थितीत आपल्याला पोलिसांसोबत काम करावे लागेल. यावरच चर्चा झाली आहे. आम्ही आमच्या पाच कंपन्या पोलिसांना मदत करण्यासाठी पाठवल्या आहेत. आम्ही स्वतंत्र कारवाईसाठी नाही तर पोलिसांना मदत करण्यासाठी येथे आहोत. आम्ही राज्य पोलिसांच्या मागणीनुसार काम करू. आम्हाला आशा आहे की येथे लवकरच शांतता प्रस्थापित होईल. जर पोलिसांना अधिक कंपन्यांची आवश्यकता असेल तर आम्ही त्यांना पुरवू, बीएसएफ सर्व परिस्थितीसाठी तयार आहे.’
कलकत्ता उच्च न्यायालयाने प्रभावित भागात केंद्रीय दल तैनात करण्याचे आदेश दिल्यानंतर शेखावत हिंसाचारग्रस्त भागात पोहोचले आहेत.