२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा आरोपी तहव्वुर हुसेन राणा याला अमेरिकेतून भारतात आणल्यानंतर देशातील अनेक राजकीय नेते यावर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. याचदरम्यान, काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनी देखील प्रतिक्रिया देत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले आहे.
‘मोदीजी संघी आहेत आणि आरएसएस ‘दहशतवादी’ आहे. असे विधान त्यांनी केले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कन्हैया कुमार यांनी हे वादग्रस्त विधान केले आहे. कन्हैया कुमारच्या या विधानामुळे देशातील कोट्यवधी लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. तसेच पंतप्रधानांबद्दल असे वक्तव्य करणे कोणत्याही नेत्याला शोभत नसल्याचे म्हणत कारवाईची मागणी केली जात आहे.
दुरीकडे भाजप प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी कन्हैया कुमारवर जोरदार हल्ला चढवला आहे. ते म्हणाले आहेत की, ‘तहव्वुर राणा भारतात परतल्यानंतर, प्रत्येक मुद्द्यावर पुरावे मागण्याची सवय असलेली काँग्रेस घाबरली आहे. पुन्हा एकदा कन्हैया कुमारच्या विधानांमुळे काँग्रेसच्या देशविरोधी कारवाया उघड झाल्या आहेत, ज्यामुळे पक्षाच्या दहशतवाद समर्थक अजेंड्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
‘काँग्रेस पक्ष हा दहशतवाद समर्थक पक्ष आहे. हा असा पक्ष आहे ज्यामध्ये जो व्यक्ती जितका जास्त देशाचा द्वेष करतो, देशाचा अपमान करतो आणि मतपेढीसाठी दहशतवाद्यांचे समर्थन करतो तितकाच त्याला बढती मिळते. कन्हैया कुमारचे विधान राहुल गांधींच्या सूचनेवरून देण्यात आले आहे, ज्यामध्ये तो पंतप्रधान नरेंद्र मोदी, आरएसएस आणि देशभक्त आणि सामाजिक सेवा संस्थांना शिवीगाळ करत आहे. २६/११ हल्ल्याचा सूत्रधार तहव्वुर राणा परत आल्यापासून काँग्रेस पक्ष अस्वस्थ झाला आहे.’
ते म्हणाले की, काँग्रेसचा दहशतवाद समर्थक अजेंडा १४० कोटी देशवासियांसमोर पूर्णपणे उघड झाला आहे. म्हणूनच काँग्रेस देशाच्या एकता आणि अखंडतेसाठी उभे राहणाऱ्या, दहशतवादाविरुद्ध लढणाऱ्या सर्व लोकांचा आणि संघटनांबाबत अपशब्द वापरत आहे. म्हणूनच ते पंतप्रधान मोदींना शिवीगाळ करत आहेत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला लक्ष्य करत आहेत आणि देशाची सेवा करणाऱ्या सर्व संघटनांना बदनाम करत आहेत. असं त्यांनी म्हंटल आहे.