शनिवारी हनुमान जयंतीच्या दिवशी फक्त भारतातच नाही तर नेपाळमध्येही वातावरण तापले होते. नेपाळमधील बिरगंज शहरात हनुमान जयंतीच्या मिरवणुकीदरम्यान हिंसाचाराची घटना समोर आली आहे. याठिकाणी परिस्थिती इतकी बिकट झाली होती की, प्रशासनाला परिसरात संचारबंदी लागू करावी लागली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, हिंसाचारात सहभागी असलेल्या किमान ४० लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही बीरगंजमध्ये हनुमान जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. याच मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली. ज्यामुळे दोन समुदायांमध्ये हिंसक संघर्ष झाला.
येथे मोठ्या प्रमाणात तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. ज्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण बनली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. तसेच परिस्थिती लक्षात घेता, कर्फ्यूचा आदेश देण्यात आला. येथील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने भारत-नेपाळमधील रक्सौल-बीरगंज भागातील सीमा बंद केली आहे.
बीरगंज येथे झालेल्या हिंसाचारात पोलिस आणि दंगलखोर मोठ्या प्रमाणात जखमी झाले आहेत. प्रशासनाने आज १२ वाजेपर्यंत कर्फ्यूचा आदेश जारी केला आहे.
दरम्यान, बीरगंजमध्ये झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीनंतर हा कर्फ्यू आणखी वाढवला जाण्याची शक्यता आहे.