सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान मुख्य न्यायाधीश संजीव खन्ना लवकरच निवृत्त होणार आहेत. अशातच नवीन सरन्यायाधीश कोण होणार याबद्दल देशात खूप उत्सुकता होती. ज्यावर आता निर्णय घेण्यात आला आहे. न्यायाधीश संजीव खन्ना यांच्यानंतर आता भूषण गवई यांच्या नावावर भारताचे नवे सरन्यायाधीश म्हणून शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.
आता महाराष्ट्रातील प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ भूषण गवई हे देशाचे सरन्यायाधीश असतील. ते १४ मे रोजी ५२ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांना सरन्यायाधीश म्हणून शपथ देतील.
भूषण गवई यांच्याबद्दल बोलायचे झाल्यास त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अनेक नवीन गोष्टी सुरू केल्या होत्या. जसे की, त्यांनी जनहित याचिकांच्या सुनावणीसाठी आठवड्यातून एक दिवस निश्चित केला होता. त्यांनी सामान्य लोकांसाठीही अनेक आदेश दिले होते. याशिवाय, उत्तर प्रदेशात सुरू झालेल्या बुलडोझर कारवाईवरही त्यांनी सरकारला फटकारले होते.
कोण आहेत भूषण गवई ?
भूषण गवई यांचे वडील रामकृष्ण गवई हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे दिवंगत नेते, खासदार आणि बिहार, सिक्कीम आणि केरळ राज्यांचे माजी राज्यपाल होते. न्यायमूर्ती भूषण गवई यांचा जन्म २४ नोव्हेंबर १९६० रोजी अमरावती जिल्ह्यात झाला. मुंबईतून कायद्याची पदवी घेतल्यानंतर त्यांनी १९८५ मध्ये वकिली सुरू केली. काही काळ त्यांनी मुंबई आणि अमरावतीमध्ये काम केले. त्यांनी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश दिवंगत बॅरिस्टर राजा एस. भोसले यांच्यासोबत देखील काम केले आहे.
ते मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात न्यायाधीश झाले त्यानंतर त्यांना बढती मिळाली. २४ मे २०१९ रोजी ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले. आता ते १४ मे २०२५ रोजी मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतील. त्यांना मुख्य न्यायाधीश म्हणून सहा महिन्यांचा कार्यकाळ मिळेल. ते २३ नोव्हेंबर २०२५ रोजी निवृत्त होतील.