बांगलादेशातील अंतरिम सरकार हिंदूंविरुद्ध असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. नुकतीच मोहम्मद युनूस यांनी अशी एक घोषणा केली आहे. ज्यामुळे बांगलादेशातील हिंदूंकडून युनूस सरकार एकतर्फी झुकले असल्याचं म्हंटल जात आहे.
झालं असं की, मोहम्मद युनूस सरकराने नुकतीच ‘पोहेला बोईशाख’ या नववर्ष सणाच्या निमित्ताने देशात आयोजित केल्या जाणाऱ्या ‘मंगल शोभायात्रा’ याचे नाव बदलून ‘वर्षावरण आनंद शोभा यात्रा’ असे केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून अनेक राजकीय पक्ष आणि इस्लामिक कट्टरपंथी संघटना या बदलाची मागणी करत होते. कारण या मिरवणुकीचे नाव हिंदू संस्कृतीशी मिळतेजुळते आहे. आणि ते बदलण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती. ज्याला युनूस सरकराने मान्यता दिली आणि ‘मंगल शोभायात्रे’चे नाव बदलण्यात आले आहे.
या बदलांना युनूस सरकार ‘नवीन बांगलादेश’ व ‘समावेशकता’ धोरणाचा भाग म्हणून वर्णन करत आहे. तर दुसरीकडे हिंदू समुदायाकडून बांगलादेश सरकार पूर्णपणे मुस्लिम कट्टरपंथीयांच्या हातातील बाहुली बनत असल्याचं बोललं जात आहे.
‘पोहेला बोईशाख’ काय आहे?
पोहेला बोईशाख हा बंगाली नववर्षाचा सण आहे. जो बांगलादेशात १४ एप्रिलला आणि भारतातील पश्चिम बंगाल, त्रिपुरा, झारखंड, तसेच आसाममधील गोवालपारा आणि बाराक व्हॅली येथे १५ एप्रिलला साजरा केला जातो. या सणाचे स्वरूप वसंत ऋतूतल्या कापणीवर आधारित आहे आणि बांगलादेशाच्या अधिकृत कॅलेंडरमधील नववर्षाचा पहिला दिवस मानला जातो.
पोहेला बोईशाख सणाच्या उत्सवात मिरवणुका, मेळे यांचे आयोजन केले जाते. नववर्षात बंगाली लोक एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा देतात. बांगलादेशात या उत्सवात ‘मंगल शोभायात्रा’ आयोजित केली जाते. जे आता ‘वर्षावरण आनंद शोभा यात्रा’ म्हणून ओळखले जाईल. २०१६ मध्ये, ढाका विद्यापीठाच्या ललित कला विभागाद्वारे आयोजित केलेल्या या शोभायात्रेला यूनेस्कोने मानवतेचा सांस्कृतिक वारसा म्हणून मान्यता दिली होती.
दरम्यान, आज बांगलादेशात बंगाली नववर्ष १४३२ साजरे केले जाणार आहे. यानिमित्ताने आज बांगलादेशात भव्य मिरवणुकीचे आयोजन देखील केले जाईल.