Andhra Pradesh: आंध्र प्रदेशातील अनाकपल्ली जिल्ह्यातील कैलासापट्टणम गावात एका फटाक्याच्या कारखान्यात 13 एप्रिल रोजी (रविवार) भीषण स्फोट झाला आहे. या दुर्घटनेत आठ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट कोटौरतला मंडलातील कैलासापट्टणम येथे असलेल्या फटाक्याच्या उत्पादन युनिटमध्ये झाला आहे
कारखान्यात झालेला स्फोट इतका मोठा होता की, कारखान्याची इमारत पूर्णपणे कोसळली होती. स्फोटानंतर कारखान्यात आग लागली आणि ती वेगाने पसरली, ज्यामुळे आत काम करणारे अनेक कामगार अडकले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचे आणि बचावकार्य करण्याचे प्रयत्न सुरू केले होते. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, फटाक्यांसाठी रासायनिक मिश्रण तयार करत असताना हा अपघात झाला आहे.
या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. जखमींपैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून, जखमींना तातडीने सर्वोत्तम वैद्यकीय मदत पुरवण्याचे आणि मृतांच्या कुटुंबीयांना योग्य नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेवर शोक व्यक्त केला असून, मृतांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी २ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्याचे गृहमंत्री वंगालापुडी अनिता यांनी घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. त्यांनी या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, फटाक्याच्या कारखान्यातील सुरक्षा मानकांचे पालन करण्याच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.