Shaikh Hasina: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी रविवारी (१३ एप्रिल रोजी) ढाका येथे झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात बांगलादेशी जनतेशी व्हर्च्युअल माध्यमांद्वारे थेट संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी बांगलादेशचे अंतरिम सरकार मोहम्मद युनूस यांच्यावर जोरदार हल्ला चढवल्याचे पाहायला मिळाले. यादरम्यान त्यांनी बांगलादेशातील हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या अवामी लीगच्या नेत्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला.
शेख हसीना यांनी आपल्या भाषणात मोहम्मद युनूस यांना इशारा दिला आहे. त्या म्हणाल्या की, “ज्यांनी कायद्याचे उल्लंघन केले आहे, त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील. युनूस यांनी कायद्यापेक्षा मोठे असल्याचा आव आणू नये. त्यांनी लोकांना भडकावण्याचा प्रयत्न थांबवावा. जर तुम्ही आगीशी खेळण्याचा प्रयत्न कराल, तर लक्षात ठेवा, त्यात तुम्हीच जळून खाक व्हाल.”
शेख हसीना यांनी युनूस यांच्यावर असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचा पुनरुच्चार केला. त्यांनी गरीब महिलांना दिलेल्या कर्जाच्या पैशाचा गैरवापर केल्याच्या आरोपांवरून सुरू असलेल्या खटल्यांचा संदर्भ दिला. तसेच शेख हसीना यांनी युनूस यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळत असलेल्या समर्थनावरही अप्रत्यक्षपणे टीका केली. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा आणि माजी परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यांच्यासारख्या जागतिक नेत्यांनी युनूस यांना पाठिंबा दर्शवल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. हसीना म्हणाल्या की, “काही आंतरराष्ट्रीय लोक त्यांच्या बाजूने बोलत आहेत. पण त्यामुळे ते कायद्यापेक्षा मोठे ठरतात का? बांगलादेशात कायदा सर्वांसाठी समान आहे आणि त्याचे पालन करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.”
शेख हसीना यांच्या या थेट आणि कठोर भूमिकेमुळे बांगलादेशमधील राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे. दरम्यान त्यांनी बांगलादेशी जनतेला बांगलादेशात लवकरच परतण्याचे आश्वासनही दिले आहे.