२८ मार्च रोजी म्यानमारमध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपामुळे देशात मोठे नुकसान झाले आहे. या भूकंपामुळे म्यानमारवर ओढावलेल्या कठीण प्रसंगात अनेक देश त्यांच्यासोबत उभे असून, मदत करत आहेत. यात भारत देखील मागे नाही. भारताने पहिल्या दिवसापासून म्यानमारमध्ये मदत कार्य सुरु ठेवले आहे. भारत ऑपरेशन ‘ब्रह्मा’ अंतर्गत म्यानमारला मदत करत आहे.
दरम्यान, म्यानमारयामध्ये राबवण्यात येणाऱ्या ऑपरेशन ‘ब्रह्मा’ मदत मोहिमेदरम्यान, भारतीय हवाई दलाच्या C-130J विमानावर GPS-स्पूफिंग हल्ला झाला असल्याची माहिती समोर येत आहे.
या स्पूफिंग हल्ल्यामुळे रिअल-टाइम कोऑर्डिनेट्स बदलले, ज्याचा विमानाच्या नेव्हिगेशन सिस्टमला उड्डाणादरम्यान चुकीचे दिशानिर्देश मिळाले. अशास्थितीत बरोबर नेव्हिगेशन सुनिश्चित करण्यासाठी आयएएफच्या वैमानिकांनी ताबडतोब नेव्हिगेशन सिस्टम (आयएनएस) वर स्विच केले.
GPS स्पूफिंग हल्ला काय आहे?
GPS स्पूफिंग म्हणजे GPS रिसीव्हरला खोट्या माहितीद्वारे दिशाभूल करणे. या हल्ल्यात, एखादी व्यक्ती किंवा गट GPS सिग्नलमध्ये बदल करून, रिसीव्हरला चुकीचे स्थान, चुकीची वेळ दाखवते. हे सिग्नल खऱ्या GPS सिग्नलसारखे दिसतात, ज्यामुळे रिसीव्हरला ते खरे सिग्नल वाटतात आणि त्यानुसार तो कार्य करतो.
दरम्यान, भारत-पाकिस्तान सीमेजवळही अशाच प्रकारच्या फसवणूकीच्या घटना घडल्या आहेत. नोव्हेंबर २०२३ पासून, अमृतसर आणि जम्मूजवळ अशी ४६५ प्रकरणे नोंदवली गेली आहेत.