नुकतेच राजकारणात प्रवेश केलेले तमिळ चित्रपट सृष्टीतील मोठे अभिनेते थलापती विजय यांनी वक्फ कायद्याला न्यायालयात आव्हान दिले आहे. वक्फ सुधारित कायद्याविरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत त्यांनी म्हंटले आहे की, ‘हा कायदा संविधानाच्या धर्मनिरपेक्ष भावनेविरुद्ध आहे आणि धार्मिक आधारावर भेदभावाला प्रोत्साहन देतो.’
थलापती विजय यांनी ही याचिका आपला पक्ष तमिलगा वेत्री कळघम (TVK) मार्फत दाखल केली आहे. याचिकेत त्यांनी हा कायदा मागे घेण्याची मागणी केली आहे. यासोबतच त्यांनी सरकारला इशाराही दिला आहे की, ‘जर हा कायदा मागे घेतला नाही तर त्यांचा पक्ष मुस्लिमांसोबत वक्फ विरोधात कायदेशीर लढाई लढेल.’
सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून थलापती विजय यांनी त्यांच्या राजकारणाची दिशा स्पष्ट केली आहे. वक्फ कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत, ज्यावर १६ एप्रिल २०२५ रोजी सुनावणी होणार आहे.
वक्फ (सुधारणा) कायदा २०२५ म्हणजे काय?
वक्फ सुधारणा कायदा २०२५ हा केंद्र सरकारने आणलेला एक नवीन कायदा आहे, जो लोकसभा व राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला. राष्ट्रपतींनी मंजुरी दिल्यानंतर हा कायदा देशात लागू करण्यात आला आहे.
या कायद्याद्वारे वक्फ मालमत्तेबाबत अनेक नियम बदलण्यात आले आहेत. जे मुस्लिम समाजातील गरीब लोकं आणि महिलांच्या फायद्याचे आहेत. यामुळे वक्फ बोर्डाच्या मनमानी कारभाराला आळा बसणार आहे. पण विरोधकांचे म्हणणे आहे की, यामुळे मुस्लिम समुदायाच्या धार्मिक मालमत्तेबाबत सरकारला अधिक अधिकार मिळतात, जे त्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करते.