Beed: बीड जिल्ह्यातील सायबर गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक रंजित कासले सध्या एका गंभीर प्रकरणात अडकले असून त्यांना निलंबित करण्यात आले आहे. कासले त्यांच्यावर खंडणी मागणे, अनधिकृतपणे संशयितांना गुजरातला घेऊन जाणे यांसारखे आरोप आहेत. त्यातच आता रंजित कासले यांनी त्यांना वाल्मिक कराडचा एन्काउंटरच्या करण्याची ऑफर आल्याचा दावा केला आहे, त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
नेमके रंजित कासले यांच्यावरती काय आरोप आहेत:
-रंजित कासले यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची कोणतीही परवानगी न घेता एका सायबर गुन्ह्यातील संशयिताला खासगी वाहनातून गुजरातला नेले. तिथे त्यांनी कथितरित्या काही व्यक्तींना गुन्ह्यात नाव न घेण्यासाठी धमकावून तब्बल एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. या घटनेचा एक कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली होती. या व्हिडिओमध्ये कासले आणि इतर पोलीस कर्मचारी एका व्यक्तीसोबत पैशांवर बोलताना दिसत असल्याचा दावा करण्यात आला होता.
-या गंभीर प्रकारणाची दखल तातडीने घेण्यात आली आहे. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांनी प्राथमिक चौकशीनंतर रंजित कासले यांना तत्काळ निलंबित केले. त्यांच्यासोबत या कथित खंडणी वसुलीच्या वेळी असलेले पोलीस कॉन्स्टेबल रामदास गिरी आणि चालक बळीराम भाग्यवंत यांनाही नंतर निलंबित करण्यात आले.
-निलंबनाची कारवाई झाल्यानंतर कासले यांनी कथितरित्या मद्यधुंद अवस्थेत एक व्हिडिओ जारी केला होता. या व्हिडिओमध्ये त्यांनी एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यावर गंभीर आणि खळबळजनक आरोप केले. या आरोपांमुळे प्रकरणाला आणखी वेगळे वळण मिळाले आणि पोलीस दलातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला.
-त्यातच आता या प्रकरणाला आणखी एक गंभीर वळण मिळाले आहे. कारण कासले यांनी आता दावा केला आहे की, त्यांना वाल्मिक कराडच्या एन्काउंटरसाठी तब्बल ५० कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती. त्यांनी ही ऑफर नाकारल्यामुळेच त्यांचे निलंबन झाले, असा आरोप त्यांनी केला आहे. या दाव्यामुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली असून, या कथित ऑफरमागे कोण होते, याचा तपास होण्याची शक्यता आहे.
आता या सगळ्या प्रकरणात तपासातून काय सत्य समोर येईल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.