भारतात धर्मस्वातंत्र्य हे मूलभूत हक्कांपैकी एक मानले जाते. प्रत्येक व्यक्तीला आपला धर्म निवडण्याचा, पाळण्याचा किंवा बदलण्याचा अधिकार आहे. काहीवेळा, सामाजिक, वैयक्तिक, किंवा आध्यात्मिक कारणांनी लोक धर्म बदलण्याचा निर्णय घेतात. देशभरात धर्मपरिवर्तनाच्या घटना अधूनमधून समोर येताना दिसून येतात त्यामागे विविध प्रेरणा असतात कधी विवाह, कधी व्यक्तिगत श्रद्धा, तर कधी सामाजिक समजुती.
नुकतेच आता मध्य प्रदेशातील खांडवा येथील शेख अन्वर नावाच्या एका तरुणाने इस्लाम सोडून सनातन धर्म स्वीकारला आहे. महादेवगडचे संचालक अशोक पालीवाल यांच्याकडे तरुणाने सनातन धर्मात परत येण्याची विनंती केली होती. यानंतर पंडितांच्या उपस्थितीत महादेवगड येथे तरुणाचे मुंडण आणि शुद्धीकरण केले गेले. गंगाजलाने स्नान घालून आणि वैदिक विधींचे पालन करून त्याला सनातन धर्मात समाविष्ट करण्यात आले. धर्मपरिवर्तनानंतर त्याचे नाव ‘राधेश्याम’ ठेवण्यात आले.
राधेश्याम (पूर्वीचे अन्वर) यांनी सांगितले की, मी हिंदू धर्माच्या प्रभावामुळे हा निर्णय घेतला. सनातन धर्माच्या प्राचीन परंपरा आणि भव्यतेमुळे आकर्षित झालो. ते पुढे म्हणाले की सनातन धर्मात कोणत्याही गोष्टीवर बंधन नाही. धार्मिक स्थळे आणि विधींमध्ये सर्वांना समान वागणूक दिली जाते. सनातन व्यवस्थेत देवांसोबत देवीच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की इस्लाममध्ये महिलांना जो दर्जा मिळत नाही तो सनातन धर्मात मिळतो. हिंदू धर्मात, दुर्गा माँ, काली, लक्ष्मी आणि सरस्वती यांसारख्या देवींसोबतच नद्यांनाही आईचा दर्जा देण्यात आला आहे.
राधेश्याम यांनी २३ वर्षांपूर्वी लक्ष्मी नावाच्या हिंदू महिलेशी लग्न केले होते. इस्लाम धर्मात राहूनही त्यांच्या वैवाहिक जीवनात कोणताही अडथळा आला नाही. मात्र पत्नीचे सनातन धर्माबद्दल असलेले प्रेम आणि श्रद्धा पाहून त्यांचे मन हळूहळू त्या दिशेने वळले असे ते सांगतात. महादेवगडचे प्रमुख अशोक पालीवाल यांनी सांगितले की, आतापर्यंत अशा प्रकारे अर्धा डझन लोकांनी इस्लाममधून परत सनातन धर्म स्वीकारला आहे. “कोणालाही परत यायचे असल्यास महादेवगड त्यांच्यासाठी सदैव खुला आहे,” असेही त्यांनी सांगितले आहे.