Eknath Shinde: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात आज (१६ एप्रिल ) मुंबईत महत्त्वपूर्ण भेट झाली आहे. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे आणि राज ठाकरेंच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
एकनाथ शिंदे आज दुपारी राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी गेले होते. राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना जेवणाचे आमंत्रण दिले होते, असे शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले आहे. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीनंतर राज ठाकरे यांच्या निवासस्थानी झालेली एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंची ही पहिलीच भेट होती. त्यामुळे अनेक अंगांनी ही भेट महत्वपूर्ण मानली जात आहे. या भेटीनंतर दोन्ही नेत्यांनी माध्यमांशी बोलणे टाळले. त्यामुळे या भेटीत नेमके कोणते मुद्दे चर्चिले गेले, याबाबत गुप्तता पाळल्याचे दिसून येते.
मिळालेल्या माहितीनुसार, या भेटीवेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत पक्षाचे काही सहकारी आणि राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत उपस्थित होते. तर राज ठाकरे यांच्यासोबत त्यांचे पुत्र अमित ठाकरे आणि मुंबई मनसे अध्यक्ष संदीप देशपांडे उपस्थित होते.
दरम्यान, मनसेने सध्या राज्यात सर्वत्र मराठीचा वापर व्हावा, ही मागणी लावून धरली आहे. त्यामुळे मनसे राजकारणात सक्रिय होऊ पाहतेय, हे स्पष्ट जाणवते. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता ठाकरेंनी तयारी सुरू केली असावी आणि त्याचाच एक भाग म्हणजे शिंदेंची भेट, अशा देखील चर्चा रंगू लागल्या आहेत.