Rohit Sharma:भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू रोहित शर्माच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रोहित शर्माच्या नावाचे एक स्टँड करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.
या निर्णयानुसार, वानखेडे स्टेडियममधील दिवेच्या पॅवेलियनचा तिसरा स्तर आता ‘रोहित शर्मा स्टँड’ म्हणून ओळखला जाणार आहे. रोहित शर्माने भारतीय क्रिकेटसाठी महत्वपूर्ण योगदान दिले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट टीमने २०२४ चा टी-२० विश्वचषक आणि २०२५ ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. तसेच मुंबई क्रिकेटसाठीही त्याने दिलेल्या योगदानाचा गौरव म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशनने रोहित शर्माच्या नावासोबतच स्टेडियममधील इतर स्टॅंडला दोन महत्त्वाच्या व्यक्तींची नावे देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ग्रँड स्टँडच्या तिसऱ्या स्तराला माजी बीसीसीआय अध्यक्ष शरद पवार यांचे नाव दिले जाणार आहे तर चौथ्या स्तराला माजी कर्णधार अजित वाडेकर यांचे नाव दिले जाईल.
दरम्यान, रोहित शर्माच्या नावाचे स्टँड वानखेडे स्टेडियमवर असणे, रोहित शर्मासाठी मोठा सन्मान आहे. या स्टेडियमवर यापूर्वी सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, दिलीप वेंगसरकर आणि विजय मर्चंट यांच्या नावाचे स्टँड्स आहेत. आता रोहित शर्मा देखील या दिग्गजांच्या पंक्तीत सामील झाल्याने रोहित शर्माचे चाहते प्रचंड खुश असून सोशल मीडियावर रोहितचे कौतुक करत आहे.