परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी मंगळवारी दहशतवादावरून पाकिस्तानला चांगलेच घेरले. जयशंकर यांनी म्हटले आहे की पाकिस्तानने अफगाणिस्तानात तालिबानसोबत आणि दुसऱ्या देशांसोबत एकाच वेळी खेळ खेळण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी, तो स्वतःच आपल्या फसवणुकीत अडकला आहे. गुजरातमधील चरोतर विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठातील एका संवाद कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी हे भाष्य केले.
ते म्हणाले की “पाकिस्तान दोन्ही बाजूंना खुश ठेवण्याचा प्रयत्न करत होता, पण जेव्हा अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानमधून बाहेर गेले, तेव्हा पाकिस्तानची खेळी उघड झाली.” मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करताना जयशंकर म्हणाले, “त्या हल्ल्यानंतर भारतीयांमध्ये खूप तीव्र भावना होत्या की, आता शेजारी देशाचे असे वागणे सहन करणे शक्य नाही. पण त्या वेळी भारत सरकारने त्या भावना पूर्णपणे समजून घेतल्या नाहीत.”
पुढे बोलताना ते म्हणाले, की “भारत आता बदलला आहे, आणि पाकिस्तानही बदलला आहे पण दुर्दैवाने, त्यांनी दहशतवादासारख्या जुन्या वाईट सवयी अजूनही सोडलेल्या नाहीत.” २०१४ नंतर भारतात सरकार बदलल्यावर पाकिस्तानला स्पष्ट संदेश देण्यात आला की, जर त्यांनी दहशतवादी कारवाया केल्या तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असेही त्यांनी सांगितले. “या काळात भारत आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या प्रगती करत आहे आणि जगात आपली प्रतिष्ठा वाढली आहे. पण पाकिस्तान अजूनही मागेच आहे. त्यामुळे भारताने आता पुढे जावे, आणि पाकिस्तानावर वेळ वाया घालवू नये,” असे जयशंकर म्हणाले.
काही दिवसांपूर्वीच तहव्वुर राणा या २६/११ च्या मुख्य आरोपीला अमेरिकेने भारतात पाठवले आहे. यावर प्रतिक्रिया देताना जयशंकर म्हणाले की, “ही घटना भारत आणि अमेरिकेतील दहशतवादविरोधी सहकार्याचा मोठा भाग आहे. त्या हल्ल्यातील मृतांना न्याय मिळवून देण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.