अयोध्येतील राम मंदिराला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकी देणारा ईमेल अयोध्या राम मंदिर ट्रस्ट आणि उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांच्या डीएमना आला आहे. धमकीचा मेल मिळाल्यानंतर मंगळवारी या प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
धमकीचा ईमेल हा रविवारी पाठवण्यात आला होता. या ईमेलमध्ये मंदिरावर बॉम्ब हल्ला करण्याची धमकी देण्यात आली होती तसेच सुरक्षा वाढवण्याचे निर्देशही देण्यात आले होते.
धमकीचा ईमेल मिळाल्यानंतर, मोठ्या प्रमाणात शोध मोहीम सुरू करण्यात आली व परिसरात दक्षता वाढविण्यात आली आहे. पोलिसांना शोध मोहिमेत अजूनतरी काहीही सापडले नसले तरी, राम जन्मभूमी ट्रस्ट कार्यालयाचे लेखा अधिकारी महेश कुमार यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
देशभरातून दररोज हजारो भाविक अयोध्येत येत आहेत. अशातच धमकीचा ईमेल आल्याने आता प्रशासन सतर्क झाले आहे. आणि सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
खरं तर मुंबई २६/११ हल्ल्यातील दहशदवादीतहव्वूर राणाला अमेरिकेतून भारतात आणल्यानंतर देशभरातील सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. या प्रकरणी गुप्तचर यंत्रणांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्यातच आता अयोध्येतील राम मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी आल्यानंतर प्रशासन आणखीनच सतर्क झाले आहे.