Dattatray Bharane: महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारे प्रतिष्ठित शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सन २०२३-२४ साठी जाहीर करण्यात आले आहेत. राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मंत्रालयात पत्रकार परिषदेत घेत या पुरस्कारांची घोषणा केली आहे. यंदा विविध क्रीडा प्रकारांतील एकूण ८९ खेळाडूंना या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
या पुरस्कार सोहळ्यात माजी राष्ट्रीय कबड्डीपटू शंकुतला खटावकर यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तर पॅरालिम्पिक पदक विजेता सचिन खिलारी, विश्वविजेती तिरंदाज अदिती स्वामी, ओजस देवतळे, क्रिकेटपटू शिवम दुबे, ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जैस्वाल यांसारख्या खेळाडूंना शिवछत्रपती राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
शिवछत्रपती राज्य पुरस्कार्थींना प्रत्येकी तीन लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तर जीवनगौरव पुरस्कारासाठी पाच लाख रुपये देण्यात येणार आहेत. या पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन १८ एप्रिल २०२५ रोजी पुण्यातील बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यावरती क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे म्हटले आहेत की, राज्यातील क्रीडा संस्कृतीचा वारसा जपला पाहिजे आणि त्याला चालना दिली पाहिजे. क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल क्रीडा प्रशिक्षक, मार्गदर्शक आणि खेळाडूंचा सन्मान करणे छत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करणे ही एक अभिमानास्पद परंपरा आहे. तसेच ८९ खेळाडूंना एकाच वेळी हा मानाचा युवा खेळाडूंना प्रेरणा मिळेल, असा विश्वास क्रीडा मंत्र्यांनी व्यक्त केला आहे.