Tanisha Bhise: गर्भवती महिला तनिषा भिसे यांच्या मृत्यूनंतर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर टीकेची झोड उठली आहे. रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे तनिषाचा मृत्यू झाल्याने राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. त्यातच राज्य सरकारने या प्रकरणी चौकशी करण्यासाठी जी समिती नेमली होती त्या समितीने दीनानाथ रूग्णालयाला दोषी ठरवले आहे. त्यानंतर ससून रूग्णालयाच्या वैद्यकीय समितीचा या प्रकरणी काय अहवाल येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विशेष म्हणजे मंगळवारी म्हणजे १५ एप्रिल रोजी दिवसभर या प्रकरणी ससूनच्या वैद्यकीय तज्ञांची बैठक सुरू होती. या तज्ज्ञ समितीने दीनानाथ हॉस्पिटल, सूर्या हॉस्पिटल, मणिपाल हॉस्पिटल आणि इंदिरा आयव्हीएफ फर्टिलिटी सेंटर यांनी दाखल केलेल्या उत्तरांची देखील तपासणी केली आहे. या बैठकीनंतर रात्री हा अहवाल तयार पूर्ण करण्यात आला आहे. मात्र अद्याप ससून समितीचा अहवाल पूर्णपणे गुप्त ठेवण्यात आला असून तो सार्वजनिक करण्यात आलेला नाही. त्यामुळे तनिषा भिसे यांच्या मृत्यूचे नेमके कारण काय होते आणि उपचारात हलगर्जीपणा झाला होता का, याबाबत ससूनच्या अहवालातील अधिकृत माहिती समोर आलेली नाही. परंतु हा अहवाल अद्याप गुप्त ठेवल्यामुळे विविध चर्चांण उधाण आले आहे.
अहवालात काही संवेदनशील माहिती असू शकते. त्यामुळे हा अहवाल तो सार्वजनिक करण्यापूर्वी काळजी घेतली जात आहे. तसेच पोलीस तपासावर त्याचा परिणाम होऊ नये, यासाठीही गुप्तता राखली जात असल्याच्या देखील चर्चा सुरू आहेत. मात्र याबाबत कोणीही अधिकृत प्रतिक्रिया माध्यमांना दिलेली नाही.
दरम्यान,राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी स्पष्ट केले होते की, ससूनचा अहवाल प्राप्त झाल्यावर त्यात दोषी आढळलेल्यांवर निश्चित कारवाई केली जाईल. मात्र ससूनचा अहवाल कधी सार्वजनिक केला जाईल याबाबत त्यांनी कोणतीही निश्चित माहिती समोर आलेली नाही.