भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी त्यांचे उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती बीआर गवई यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे. सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी त्यांच्या नावाची शिफारस केंद्र सरकारकडे पाठवली आहे. न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई हे भारताचे ५२ वे सरन्यायाधीश होणार आहेत. न्यायमूर्ती खन्ना संजीव १३ मे रोजी निवृत्त होत आहेत. खन्ना संजीव यांच्या निवृत्तीनंतर न्यायमूर्ती गवई हे १४ मे रोजी मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतील. न्यायमूर्ती गवई ६ महिने मुख्य न्यायाधीशपद भूषवतील.
नियमानुसार, सध्याचे सरन्यायाधीश त्यांच्या कार्यकाळाच्या शेवटच्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयातील सर्वात ज्येष्ठ न्यायाधीशाच्या नावाची शिफारस सरकारला पाठवतात. सरकार सहसा ती शिफारस स्वीकारते. भारताचे सरन्यायाधीश (CJI) संजीव खन्ना यांनी त्यांचे उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांची अधिकृतपणे शिफारस केली आहे. त्यांचे नाव केंद्रीय कायदा मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आले आहे.
गवई यांचा आतापर्यंतचा प्रवास
न्यायमूर्ती गवई यांनी १६ मार्च १९८५ रोजी वकिली सुरू केली. त्यांनी १९८७ ते १९९० पर्यंत मुंबई उच्च न्यायालयात आणि १९९० पासून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात वकिली केली. ऑगस्ट १९९२ ते जानेवारी २००० पर्यंत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात महाराष्ट्र सरकारचे वकील म्हणून काम केले. १४ नोव्हेंबर २००३ रोजी त्यांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. २४ मे २०१९ रोजी त्यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. दरम्यान, आता न्यायमूर्ती गवई २३ नोव्हेंबरपर्यंत देशाचे मुख्य न्यायाधीश राहतील.