Udhav Thackeray: नुकताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा निर्धार मेळावा नाशिकमध्ये जल्लोषात पार पडला आहे. या मेळाव्यात शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजाचा वापर करण्यात आल्याने विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. विशेष म्हणजे, हा आवाज प्रत्यक्ष बाळासाहेब ठाकरेंचा नसून कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा(AI) वापर करून तयार करण्यात आला होता, असा दावा केला जात आहे. मात्र बाळासाहेबांचा आवाज ऐकून शिनसैनिकांमध्ये उत्साह निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.
एआयचा वापर करून तयार करण्यात आलेल्या भाषणात बाळासाहेब काय म्हणाले:
“माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो आज तुफान गर्दी दिसत आहे. अरे नाशिक म्हटल्यावर गर्दी उसळणारच नाशिक आणि शिवसेनेचे एक नाते नाही म्हटले तरी आहेच आणि ते राहणारच. म्हणजे, ते कोण नरेंद्र मोदी म्हणतात तसे. तसे हे नाते नाही की, नाशिक से मेरा पुराना नाता हैं मैं यहा वीर सावरकर जी के साथ काम करता था, अरे जातील तिथे गंडवायचे आणि लोकंही गंडतात. ही नाती जपणारी माणसे नाहीत. कमळाबाई म्हणजे एक ढोंग आहे ढोंग. भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात काय, देशात कोणी ओळखत नव्हते. तेव्हा आम्ही त्यांना खांदा दिला. एकंदरित बाळासाहेबांच्या आवाज वापरून भाजपवर जोरदार टीका करण्यात आली आहे.”
या सगळ्या प्रकारावरती भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी यांनी जोरदार टीका केली आहे. बावनकुळे यांनी म्हटले आहे की, आपला आवाज कुणी ऐकत नाही, म्हणून आपले विचार हिंदूहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजात ऐकवण्याचा पोरकटपणा फक्त आणि फक्त उबाठासारखा गटच करु शकतो.”
या घटनेनंतर राजकीय वर्तुळात आणि समाज माध्यमांवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी याला मतदारांना भावनिक आवाहन करण्याचा आणि त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. तर काही तंत्रज्ञानप्रेमींनी निवडणुकीत एआयचा वापर ही एक नवी सुरुवात असल्याचे मत व्यक्त केले आहे.
महत्वाचे म्हणजे यानिमित्ताने निवडणुकीच्या प्रचारात तंत्रज्ञानाचा वापर कोणत्या थरापर्यंत जाऊ शकतो, यावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित आहेत. कारण असे जर दिवंगत नेत्यांचे एआयच्या मदतीने भाषणे दाखवायला सुरवात झाली तर उद्या कोणीही उठून दिवंगत नेत्यांनी जी वक्तव्ये केलीही नव्हती, अशी वक्तव्ये राजकीय हेतूतून समोर आणली जाऊ शकतात आणि अशामुळे सामान्य जनतेमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. त्यामुळे निवडणूक आयोगाने या प्रकरणाची दखल घ्यावी आणि निवडणुकीत किंवा राजकारणात एआय तंत्रज्ञानाचा वापर कसा नियंत्रित केला जाऊ शकतो, याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी करावी, अशी मागणी काहींकडून होताना दिसत आहे.
खरेतर मतदारांना किंवा जनतेला सत्य माहिती मिळवण्याचा हक्क आहे आणि अशा प्रकारे पुढे एआयचा वापर राजकारणात वाढल्यास जनेतेची दिशाभूल होऊ शकते असे अनेकांचे म्हणणे आहे. त्यामुळे अशा प्रकारांना वेळीच आळा घालणे गरजेचे आहे, असे मत अनेकांकडून व्यक्त होत आहे.