Ajit Pawar: सध्या ठाकरे गटातील अनेक नेते शिवसेनेमध्ये किंवा भाजपमध्ये प्रवेश करताना दिसत आहे. मात्र आता सांगली जिल्ह्यातील चार बडे नेते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे हे सर्व नेते माजी आमदार असून लवकरच मुंबईत होणाऱ्या एका विशेष कार्यक्रमात पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे एकाच वेळी चार नेते अजित पवारांकडे चालले असल्यामुळे अजित पवारांची सांगली जिल्ह्यात ताकद वाढणार हे तर निश्चितच.
शिराळ्यातील शिवाजीराव नाईक, कवठेमहांकाळचे अजितराव घोरपडे, आटपाडीचे राजेंद्रअण्णा देशमुख आणि जतचे विलासराव जगताप हे चार माजी आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. त्यासोबतच जत आणि आटपाडी तालुक्यातील काही प्रमुख भाजप पदाधिकारी देखील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
या चार नेत्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये विविध पक्षांतून निवडणूक लढवली असून अनेकदा बंडखोरीची भूमिका देखील घेतली होती. परंतु आता हे चार नेते सोबतच अजित पवारांकडे येत असल्याने ग्रामीण भागातील सत्तास्थानांवर याचा मोठा प्रभाव पडेल, अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या पक्षप्रवेशाला महत्व प्राप्त झाले आहे.
दरम्यान, सध्या शरद पवार गटात असलेले शिराळ्याचे माजी आमदार मानसिंगराव नाईक यांची भूमिका काय आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ते सध्या शरद पवार गटात असले तरी अजित पवार यांच्याशी त्यांचे सौहार्दपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे ते काय निर्णय घेतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.