Chitale Bandhu: पुण्यातील प्रसिद्ध मिठाई आणि खाद्यपदार्थ उत्पादक चितळे बंधू मिठाईवाले यांच्या नावाने बनावट बाकरवडीची विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी चितळे बंधू मिठाईवाले कंपनीचे इंद्रनील चितळे यांचे पर्सनल सेक्रेटरी यांनी ही तक्रार दिली आहे. त्या आधारे पुणे पोलिसांनी संबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये ‘चितळे स्वीट होम’ या दुकानाचे मालक प्रमोद प्रभाकर चितळे यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रमोद प्रभाकर चितळे यांनी चितळे बंधू मिठाईवाले यांचे अधिकृत ई मेल आयडी, कस्टमर केअर नंबर, मॅन्युफॅक्चरींग डिटेल्स आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स यांची माहिती आहे तशी त्यांच्या बाकरवडीच्या पाकिटावर वापरली. तसेच अधिकृत चितळे बंधू मिठाईवाले यांचीच ही बाकरवडी असल्याचे भासवून नावाचा गैरवापर करुन फसवणूक केली, असा उल्लेख पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आलेल्या तक्रारीत आहे.
या फसवणुकीमुळे चितळे बंधू मिठाईवाले यांच्या प्रतिष्ठेला आणि व्यवसायाला मोठा फटका बसल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे कंपनीने पोलिसात तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी प्रमोद चितळे यांच्याविरोधात भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, उपलब्ध माहितीनुसार चितळे बंधू मिठाईवाले यांचा भोर तालुक्यातील मौजे रांजे येथे बाकरवडी तयार करण्याचा मुख्य प्लॉन्ट आहे. याशिवाय पर्वती इंडस्ट्रीयल, टिमवि कॉलनी मुकुंदनगर याठिकाणी देखील बाकरवडी तयार करण्याचे छोटे युनिटस् आहेत. परंतु अशा प्रकारे चितळे बंधूचे नाव वापरून बाकरवडी विकली जात असल्यामुळे ग्राहकांमध्ये सुद्धा खळबळ उडाली आहे.