Santosh Deshmukh:बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्याचे सामाजिक, राजकीय समीकरणे पूर्णपणे बदललेली दिसत आहेत. यादरम्यान सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवरती जोरदार टीका केल्याचे पाहायला मिळाले. या सगळ्या प्रकरणानंतर आज पहिल्यांदाच शिरूर कासार तालुक्यातील पिंपळनेर गावात संत भगवान बाबा गडाच्या नारळी सप्ताहाचा सांगता समारंभानिमित्त धनंजय मुंडे आणि सुरेश धस हे दोघेही एकाच मंचावर दिसणार होते.
परंतु ऐनवेळी धनंजय मुंडेंचा या ठिकाणचा दौरा रद्द झाला. धनंजय मुंडेंनी आपल्या एक्सवरती पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. धनंजय मुंडेंनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, मी पिंपळनेर (ता. शिरूर कासार) येथील संत श्री भगवानबाबा यांच्या परंपरेतील नारळी सप्ताहात येण्यासाठी सकाळी साधारण दहा वाजल्यापासून मुंबई येथील पवन हंस विमानतळावर आहे. मात्र काही तांत्रिक कारणांनी अजूनही उड्डाण करण्यास परवानगी मिळत नसल्याने माझा आजचा पिंपळनेर (शिरूर कासार) दौरा जड अंतःकरणाने रद्द करावा लागतो आहे. अध्यात्मिक कार्यक्रमास आपल्यामुळे विलंब नको म्हणून याबाबत आदरणीय शास्त्री बाबांना कल्पना दिली आहे.
https://twitter.com/dhananjay_munde/status/1912763571148038349
सुरेश धस कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहचताच त्यांना धनंजय मुडेंबाबत विचारण्यात आले होते, त्यावेळी धस म्हणाले होते की, भगवान बाबा यांना मानणारे सर्व लोक या कार्यक्रमास येणार आहे. त्यामुळे धनंजय मुंडेसुद्धा येतील. भगवान बाबांच्या नारळी सप्ताहाला सर्वच पक्षाच्या लोकांनी यावे, हीच अपेक्षा आहे. या ठिकाणी काही राजकारण नाही. भगवान बाबा यांच्या पुढे काहीच नाही. येथे नामदेव शास्त्री, भगवान बाबा एवढेच आहे. धनंजय मुंडे आणि आमचे राजकीय युद्ध बाहेर असणार आहे, मात्र या ठिकाणी भगवान बाबा यांचा आशीर्वाद घ्यावा इतकेच आहे.