‘आम्ही हिंदू आहोत, पण हिंदी नाही…’ असे ट्विट मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी केले आहे. या ट्विटसह त्यांनी राज ठाकरेंचा देखील फोटो शेअर केला आहे. राज्य सरकारने शाळेत पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची केल्यानंतर देशपांडे यांचे हे ट्विट चर्चेत आले आहे. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील शाळेत हिंदी सक्तीच्या विरोधात ट्विट करत त्याला विरोध दर्शवला आहे.
होय,आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही pic.twitter.com/UkIIHr3OuV
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) April 18, 2025
राज्यातील शैक्षणिक विभागात हिंदीची सक्ती खपवून घेणार नाही अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी संताप व्यक्त केला होता. त्यानंतर आता संदीप देशपांडे यांनीही ट्विट केले असून, मनसेचा हिंदी सक्तीला विरोध कायम असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, हिंदी भाषा सक्तीची केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष निश्चितच आंदोलनाची भूमिका घेईल. त्याआधी राज ठाकरे यांच्याशी चर्चा करू. महाराष्ट्रात मराठीला प्राधान्य द्यावे का? अशी जर चर्चा होत असेल तर हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. देशातील विविध भाषा टिकायला हव्यात, म्हणून भाषावार प्रांतरचना करण्यात आली. पण आता दुसऱ्या राज्याची भाषा माझ्यावर लादू शकत नाहीत. तिसरी भाषा ही ऐच्छिकच असली पाहिजे. मला हिंदी वगळता दुसरी कोणतीही भारतीय भाषा शिकायची असल्याच मी ती शिकेन. पण हिंदीच का शिकायची? असा प्रश्न उपस्थित करत संदीप देशपांडे यांनी काल राज्यात आंदोलनाचा इशारा दिला होता.
महाराष्ट्र शासनाने नुकतच राज्यात नवीन शैक्षणिक धोरण लागू केले आहे. या धोरणानुसार, जून २०२५ पासून म्हणजेच पुढील शैक्षणिक वर्षापासून राज्यातील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना हिंदी भाषा तिसऱ्या भाषेच्या रूपात शिकावी लागणार आहे. नव्या शैक्षणिक धोरणानुसार राज्यातील शिक्षणात मराठी, इंग्रजी आणि हिंदी या तीन भाषा सक्तीच्या असतील. यावरूनच सध्या राज्यात गोंधळ उडाला आहे.