Beed Case: बीड जिल्ह्यातील सायबर गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक रंजित कासले सध्या एका गंभीर प्रकरणात अडकला असून काही दिवसांपूर्वी त्याला निलंबित करण्यात आले आहे. कासलेवर खंडणी मागणे, अनधिकृतपणे संशयितांना गुजरातला घेऊन जाणे यांसारखे आरोप आहेत. त्यातच रंजित कासलेने दावा केला होता की, त्याला वाल्मिक कराडचा एन्काउंटरच्या करण्याची ऑफर धनंजय मुडेंनी दिली होती, त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
अखरे कासले याला शुक्रवारी(१८ एप्रिल) पहाटे पुण्यातील एका हॉटेलमध्ये सापळा रचून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. महाराष्ट्र पोलीस आपल्याला अटक करू शकणार नाही, असे ओपन चॅलेंज कासलेने दिले होते. परंतु पुण्याच्या हॉटेलमधून कासलेला आज अटक करण्यात आलीआहे.
आता कासले याला पोलिस ताब्यात घेतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पाच ते सहा पोलीस अधिकाऱ्यांचे पथक कासलेला हॉटेलमधून घेऊन जाताना दिसत आहे. कासलेला ताब्यात घेतल्यामुळे आता संतोष देशमुखांच्या हत्येविषयीही नवीन माहिती समोर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
अटकेपूर्वी त्याने निवडणुकीतील ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा झाल्याचाही दावा केला आहे. मात्र, वाल्मिक कराडच्या एन्काउंटर ऑफरच्या प्रश्नावर त्यांनी अधिक बोलण्यास नकार दिला. मात्र आता त्याला अटक केल्याने त्याची सखोल चौकशी होईल, त्यानंतर सत्य काय ते समोर येईल, अशी आशा आहे.