देशात वक्फ कायदा लागू करण्यात आल्यानंतर देशभरात या कायद्याच्या विरोधात आंदोलने करण्यात आली. पश्चिम बंगालमधून या कायद्याला मोठ्या प्रमाणात विरोध झाला. पश्चिम बंगाल मधील मुर्शिदाबादमध्ये झालेल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतले होते. या पार्श्वभूमीवर या ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बीएसएफ जवान तैनात करण्यात आले आहेत.
वक्फ कायद्याविरुद्धच्या मुर्शिदाबाद येथे झालेल्या हिंसाचाराचा मुद्दा देशभर जोर धरू लागला आहे. याचदरम्यान, येथील हिंसाचाराच्या चौकशीसाठी एसआयटी टीम स्थापन करण्यात आली आहे. या पथकात ९ सदस्य असतील, जे हिंसाचारग्रस्त भागाला भेट देतील अहवाल तयार करतील.
हिंसाचाराच्या चौकशीसाठी मुर्शिदाबाद रेंजचे उपमहानिरीक्षक (डीआयजी) यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. त्यामध्ये एक अतिरिक्त पोलिस अधीक्षक (गुप्तचर शाखा), दोन उपअधीक्षक – एक काउंटर इन्सर्जन्सी फोर्स (CIF) आणि दुसरा गुन्हे अन्वेषण विभाग (CID) मधील, तसेच पाच निरीक्षक (चार CID आणि एक वाहतूक पोलिस) आणि सुंदरबन पोलिस जिल्ह्याअंतर्गत सायबर गुन्हे पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांचा समावेश असेल.
पश्चिम बंगालमध्ये ११ एप्रिल रोजी, वक्फ (दुरुस्ती) कायद्याच्या विरोधात ठीक-ठिकाणी निदर्शने करण्यात आली. या निदर्शनांनी हिंसक वळण घेतले. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जाळपोळ, दंगल, दगफेक झाली. ज्यामुळे तीन लोकांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. तसेच मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
मुर्शिदाबाद हिंसाचाराच्या संदर्भात आतापर्यंत १५० लोकांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, अजूनही समसेरगंज, धुलियान आणि मुर्शिदाबादच्या इतर भागात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. येथील परिस्थिती आणखी बिघडू नये म्हणून, पोलीस याठिकाणी २४ तास तैनात आहेत. पोलिसांसोबत बीएसएफ जवान देखील तैनात आहेत.